Talegaon Dabhade : तळेगावकरांनी जाणून घेतले जिजाऊ, शिवराय व संभाजीराजे याचे जीवनचरित्र

तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा समारोप

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची अलीकडेच सांगता झाली. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांनी ‘राजमाता जिजाऊ’या विषयावर  गुंफले. दुसरे पुष्प छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर ज्येष्ठ  इतिहास संशोधक  पांडुरंग बलकवडे यांनी गुंफले तर व्याख्यानमालेचे सांगता डॉ. प्रमोद बोराडे यांच्या छत्रपती संभाजी महाराज या विषयावरील व्याख्यानाने झाली.

पहिले पुष्प गुंफताना प्रा. प्रदीप कदम यांनी जिजाऊंच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. कदम म्हणाले, ” आज समाजात विघातक शक्ती वाढत चालल्या आहेत. त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी जिजाऊसाहेबांच्या चरित्राचा अंगीकार करणे गरजेचे आहे. विचार आणि कृतीचा समन्वय होतो तिथे इतिहास घडतो हे जिजाऊ चरित्र आपल्याला शिकवते.रयतेच्या जिव्हाळ्याचा आणि वेदनांचा विचार करणारा हाच खरा राजा होय.क्षत्रियाच्या पुत्रानं रयतेचं वाली व्हावं अशी प्रेरणा जिजाऊंनी शिवरायांना दिली.जिजाऊ हा फक्त विचारच नव्हे तर कृती आणि युक्तीचे समीकरण आहे. आजही भारतातील स्त्रियांच्यासाठी प्रथम पूजनीय म्हणून जिजाऊसाहेबांचेच नाव प्रत्येकाला घ्यावे लागेल. नवीन काळात चरित्र्यवान पिढी घडविण्यासाठी आधी जिजाऊसाहेब जन्माला येणे आवश्यक आहे”

शास्त्र आणि शस्त्राची जिथं युती होते तिथं भक्ती आणि शक्तीचा संगम उदयास येतो.आधुनिकतेच्या जगात स्त्री संरक्षणासाठी जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. जिजाऊंच्या प्रेरणा आणि शिकवणीच्या आचरणातून शिवबाचं स्वराज्य उभं राहीलं.जिजाऊंच्या शिकवणीतून आजच्या मातांनी आपल्या मुलांवर विश्वास टाकायला हवा. असे प्रा. कदम म्हणाले.

यावेळी मुख्य संयोजक संतोष खांडगे, नगरसेवक गणेश काकडे, प्रकल्प प्रमुख बाळासाहेब शिंदे, सचिन कोळवणकर, वसंतराव खांडगे, नगरसेवक निखिल भगत, कैलास काळे, मिलिंद शेलार, माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, आशिष खांडगे, डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांच्यासह नागरिक व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंच्या जीवन चरित्रावर आधारित पोवाडा सादर केला. नगरसेवक निखिल भगत यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक  शंकर हदीमनी यांनी केले. सूत्रसंचालन कुसुम वाळुंज आणि लक्ष्मण मखर यांनी केले. अनिल धर्माधिकारी यांनी आभार मानले.

व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, “उध्वस्त, गुलाम हिंदुस्थानच्या उत्कर्षासाठीच जणू जिजाऊंच्या पोटी शिवबाचा जन्म झाला. सोन्याचा नांगर फिरवण्याची एकमेव ऐतिहासिक घटना लालमहालात घडली. शत्रुशी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहिती आहेत पण रयतेचं सुराज्य करणारा आदर्श राजा माहित नाही हे आमचे दुर्दैव. राज्यातील कोणतीही जनता उपाशी झोपणार नाही यासाठी अन्नछत्र सुरु केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवली. अनेक शतकानंतर शिवबाने सामान्य व्यक्तीमध्ये राष्ट्रवाद निर्माण केल्याने अठरापगड जातीचे मावळे स्वराज्य रक्षणासाठी उभे राहिले. भयमुक्त समाजासाठी शिवरायांची न्यायव्यवस्था आजमितीला गरजेची आहे. शिवाजी महराजांचा लढा हा कुठल्याही धर्माविरोधात नव्हता तर नीती अनिती, धर्म अधर्माचा, न्याय अन्यायाचा लढा होता. शिवारायांचे तत्वज्ञान आजही जगातल्या कुठल्याही समाजासाठी आदर्शवत आहे. प्रभुरामचंद्राचे चारित्र्य आणि श्रीकृष्णाची निती यांचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !”

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, अरुण  भगवान भेगडे, कैलास काळे, दीपक बीचे, मिलिंद शेलार, महेश शहा, एड.नंदकुमार काळोखे, माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कुसुम वाळूंज आणि लक्ष्मण मखरयांनी सूत्रसंचालन केले.दादासाहेब उ-हे यांनी आभार मानले.

व्याख्यानमालेचे तिसरे आणि अखेरचे पुष्प डॉ. प्रमोद बोराडे यांनी छत्रपती संभाजी महाराज या विषयावर गुंफले. यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, शिक्षण समितीचे सभापती गणेश खांडगे, नगरसेवक सुरेश दाभाडे, विलास काळोखे, रजनीगंधा खांडगे, शंकर हादीमनी, मिलिंद शेलार, माजी उपनगराध्यक्ष उमाकांत  कुलकर्णी, संभाजी शिंदे, नंदकुमार काळोखे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले, ” आजतागायत छत्रपती संभाजीराजे यांचे खरे चरित्र सर्वांच्या समोर आलेले नाही. फ्रान्स मध्ये नेपोलियनवर २ लाख १८ हजार ग्रंथ लिहिले गेले, मात्र संभाजीराजेंसारख्या वीर योद्ध्यावर तेवढी पाने देखील लिहिली गेली नाहीत हे दुर्भाग्य आहे. शिवाजीराजे यांच्या सोबत संभाजीराजे यांची तुलना कायम लोक करतात ती चुकीची ठरते, कारण दोघांच्या काळात फरक आहे. संभाजीराजे यांच्या काळात प्रत्यक्ष औरंगजेब बादशहा दक्षिणेत येऊन बसला आणि दोन युद्धामध्ये फारसा वेळ संभाजीराजे यांना मिळाला नाही. तरी आपल्या युद्धनीतीच्या आणि साहसाच्या जोरावर त्यांनी ९ वर्षे औरंगजेबाला इथे नद्या नाल्यात खेळविला. शेवटी औरंगजेब आंधळा आणि एका पायाने लंगडा झाला होता. संभाजीराजे यांचा पराक्रम प्रत्येकाने लक्षात ठेवून अशा व्याख्यानमालामध्ये संभाजीराजे या विषयावर अधिकाधिक व्याख्याने होणे अभिप्रेत आहे”

संभाजीराजांना दोन लिपी आणि चार भाषा अवगत होत्या. सर्व धर्मग्रंथाच्या अभ्यासानंतर अप्रतिम प्रतिभेतून सार म्हणून चार ग्रंथ संभाजीराजेंनी संस्कृत भाषेत लिहीले.छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराज अपवादानेच सिंहासनावर बसले. बाकी सर्व आयुष्य संघर्षातच गेले. फितुरांना हत्तीच्या पायाखाली चिरडून मारले. पुरावे नसतानाही तर्कवितर्कावर आधारीत खोटा इतिहास लिहून संभाजीराजेंना हेतुपुरस्सर बदनाम केले गेले असेही बोराडे यांनी सांगितले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कुसुम वाळुंज आणि लक्ष्मण मखर यांनी केले. कैलास काळे यांनी आभार मानले. अशा तऱ्हेने तीन दिवस तळेगावकर रसिकांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास आणि जीवनकार्याचा ओळख झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.