Talegaon Dabhade: कोरोनाबाधित नर्सच्या परिवारातील तिघांच्याही चाचणीचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’, 84 जणांना क्वारंटाईन

Talegaon Dabhade: Three members from Corona infected nurse's family tests 'negative' for coronavirus, 84 will be quarantined

एमपीसी न्यूज – माळवाडी येथील कोरोनाबाधित नर्सचा पती व दोन मुलगे अशा तिघांच्या कोरना निदान चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण 84 जणांचे विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ प्रवीण कानडे  यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना डाॅ कानडे  पुढे म्हणाले कोरोना ग्रस्त पेशंटच्या संपर्कात आलेल्या एकूण 84 जणांचे विलगीकरण करण्यात येणार असून त्यापैकी जवळच्या संपर्कातील 21 जणांचे इंदोरी येथील तोलानी मरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये विलगीकरण करण्यात येणार असून उर्वरित 63 जणांना होम क्वारांटाइन करण्यात येणार आहे.

दोन दिवसापूर्वी माळवाडी येथील 37 वर्षीय नर्स पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या नर्सच्या कुटुंबातील पती व दोन मुलगे यांनाही पुण्याच्या रूग्णालयात दाखल करून त्यांची कोरोना निदान चाचणी करून घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्या अनुषंगाने घाबरून जाण्याचे कारण नाही, तरी पण त्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले.

माळवाडी भाग याआधीच कंटेन्मेट झोन जाहीर झाल्याने या भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहनांची कडक तपासणी चालू आहे. तळेगाव शहर व माळवाडी भागात सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांचेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.