Talegaon Dabhade: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

Talegaon Dabhade: Training to farmers for prevention of humni pest infestationहुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उगवणीत ४० टक्के तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

एमपीसी न्यूज- हुमणीचा प्रादुर्भाव काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी प्रियंका पाटील यांनी नवलाख उंबरे, बधलवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, नानोली तर्फे चाकण येथे एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे कसे गरजेचे आहे याचे प्रशिक्षण दिले.

प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस , सोयाबीन व इतर पिकांची मुळे जून ते ऑक्टोबर महिन्यात खातात.

त्यामुळे पिकांचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडून संपूर्ण पीकच वाळते. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उगवणीत ४० टक्के तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी (जून ते ऑगस्ट) करणे महत्त्वाचे आहे. हुमणीची बारा महिन्यात एकच पिढी तयार होते. असे असले तरी अळीचा जास्त दिवसाचा कालावधी आणि पिकांच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता अधिक असल्याने पीक जास्त प्रमाणात नष्ट होते.

त्यामुळे हुमणी कीड नष्ट करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा सर्वांगीण उपाय करणे आवश्यक आहे.

हुमणी किडीच्या अवस्था जमिनीत आढळतात. त्याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातीला सूर्यास्तानंतर खाण्यासाठी बाभळीच्या किंवा कडुनिंबाच्या झाडांवर जमा होणारे भुंगेरे हे होय. किडींना आकर्षित करण्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे गरजेचे आहेत. त्यामुळे रॉकेल मिश्रित पाण्यात भुंगेरे पडून मरण पावतात.

हे नियंत्रण उपायामध्ये सर्वांत प्रभावी व कमी खर्चाचे आहे. म्हणून शेतकऱ्यांनी नियंत्रण सुरू करावे, असे आवाहन मावळचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी केले आहे.

प्रशिक्षण मंडळ कृषी अधिकारी वडगांव व्ही. व्ही. कुलकर्णी, कृषी पर्यवेक्षक डी.डी.तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रात्यक्षिक राम मराठे, मनिषा मराठे, गबाजी दहातोंडे, अनिल बधाले, सुदाम लोंढे यांच्या शेतावर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like