Talegaon Dabhade : मावळच्या आडवाटा धुंडाळणारे पुस्तक ‘सफर मावळची’

एमपीसी न्यूज- तळेगाव येथील दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक ओंकार वर्तले यांनी लिहिलेल्या ‘सफर मावळची’ पुस्तकामधून मावळच्या आडवाटांवरच्या ठिकाणांची संपूर्ण तपशीलवार माहिती वाचायला मिळते. या पुस्तकामुळे मावळमधील दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकंती करणाऱ्या गिर्यारोहकांना खूप मोलाची माहिती मिळते.

पर्यटन या विषयावर त्यांनी यापुर्वी सह्याद्रीतील अॉफबीट भटकंती, आडवाटेवरची भटकंती व मंदिरांच्या देशा अशी तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यानंतर त्यांनी एखादा वेगळा विषय घेऊन लिहिण्याचे त्यांनी अगोदरच ठरवले होते. डोळ्यासमोर आपला समृद्ध मावळ तालुका होताच. मग सुरु झाला त्यांचा मावळच्या आडवाटांवरच्या भटकंतीच्या ठिकाणांवर खडतर प्रवास.

दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान होते. पण भटकंतीच्या गुणामुळे हे सहज पेलले गेले. लेण्या-विहिरी-तलाव-जंगले-वारसास्थळे-किल्ले-नद्या-धबधबे..खाद्यसंस्कृती..मंदिरे या अशा सर्वसमावेशक ठिकाणांवर मावळवर पुस्तक नाहीच. एक ट्रेकर आणि लेखक म्हणून ही खंत त्यांना होतीच. म्हणूनच गेल्या दोन वर्षांपासूनचा सुरु केलेला हा मावळचा प्रवास आता पहिल्यांदाच ‘सफर मावळची’ या पुस्तक स्वरूपात वाचकांसमोर येत आहे.

कांब्रे-कल्हाट-शिलाटणे-देवघर-येलघोल-निगडे-भंडारा अशा अपरिचित लेण्या, गोधऩेश्वर-तासुबाई-पाचपांडव-विठ्ठल मंदिर अशी वेगळी मंदिरे, खांडी-परीटेवाडी-दुधीवरे-कातळधार असे सुंदर धबधबे, गोनी दांडेकर- बाबासाहेब आंबेडकर यांची निवासस्थाने- राजा रवी वर्मा यांचा छापखाना- आण्णासाहेब विजापुरकर व नारो बापुजी देशपांडे यांच्या समाधीस्थाने यात समाविष्ट केलेली आहेत.

यातील अनेक ठिकाणे तर स्थानिकांनाही माहीत नाहीत. या पुस्तकामुळे “मावळ तालुक्याच्या पर्यटनामध्ये” निश्चितच एक वेगळी दृष्टी येईल यात शंकाच नाही. खरं तर ही तालुक्याची भ्रमणगाथा आहे असं म्हटलं तरी वावगं नाही. पुण्याच्या नावीन्य प्रकाशन या संस्थेमार्फत बाजारात येत असलेले हे पुस्तक साहित्यात निश्चितच भर घालेल यात शंकाच नाही. प्रत्येक मावळवासीयाच्या घरात आवर्जुन हे पुस्तक असायलाच हवे. या पुस्तकात एकूण 70 प्रकरणे समाविष्ट आहेत तसेच आकर्षक रंगीत फोटोही आहेत. हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व बुकस्टॉलवर तसेच बुकगंगा या मराठी पुस्तकाच्या अॉनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तळेगावातील वाचकांसाठी दिपक बुक स्टोअर रेल्वे स्टेशनवर उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.