Talegaon Dabhade : समाजकंटकांनी लावलेल्या आगीमध्ये ‘ऑक्सीजन पार्क’मधील झाडे भस्मसात

एमपीसी न्यूज- घोरावडेश्वर डोंगरावर काही समाजकंटकांनी लावलेल्या आगीमध्ये येथील हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना ताजी असतानाच तळेगाव येथील ऑक्सीजन पार्कमधील झाडे जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (दि. 20) रात्री हा प्रकार घडला. या आगीमध्ये 100  हुन अधिक झाडे जळाली आहेत. तळेगाव दाभाडे रोटरी क्लबच्या वतीने ही झाडे लावण्यात आली होती.

मागील दोन वर्षांपासून तळेगाव रोटरी क्लबने परिश्रमपूर्वक ही झाडे जोपासण्याचे काम केले आहे. या घटनेमुळे निसर्गप्रेमी आणि तळेगाव रोटरी क्लबच्या सदस्यांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पसरलेल्या वासामुळे ही आग लावण्यासाठी रॉकेलचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही खोडसाळ व विघातक घटना या लागवडीमधे मद्यपान करीत बसणाऱ्या व्यक्तींना हटकल्याने झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेनंतर क्लब सदस्यांची तातडीची बैठक घेण्यात आली असून आजपासून या आगीमध्ये वाचलेल्या 50 टक्के झाडांना रोज पाणी देऊन जगविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीला क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, यादवेंद्र खळदे, विलास जाधव, विश्वनाथ मराठे, उपाध्यक्ष शंकरराव जाधव, सचिव आगळे, वृक्षसंवर्धनातील जाणकार रो. ज्ञानेश्रर पाटील, रो. महेश महाजन उपस्थित होते. हा सर्वासाठी मोठा मानसिक धक्का असला तरीही खचुन न जाता परत जोमाने कामाला लागण्याचे या बैठकीत ठरले. त्याचप्रमाणे जळालेल्या झाडांच्या जागी नवीन लागवड करण्याचा निश्चय करण्यात आला.

तळेगांव दाभाडे नगरपरिषदेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत असून त्यासाठी उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड व मुख्याधिकारी वैभव आवारे यांचेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य तातडीने मिळत आहे. यापुढे तज्ञांचा सल्ला घेऊन जास्तीत जास्त जळीत झाडांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न होईल. तसेच कायदेशीर कार्यवाहीची दिशा ही निश्चित करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.