Talegaon Dabhade : भूमिगत विद्यूत केबल उघड्यावर आल्यामुळे अपघाताचा धोका

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विद्युत विभागाकडून एलईडी दिवे आणि पोल बसविण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामातील काही ठिकाणच्या भूमिगत केबल उघड्या पडल्या आहेत. या केबलवरून जड वाहन गेल्यास केबल तुटून विजेच्या प्रवाहामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरातील मुख्य रस्ते, तसेच अंतर्गत रस्ते, गल्ली बोळात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. या एलईडी दिव्याच्या केबल खोदाई करून नेण्यात आलेल्या आहेत. शहरात मोठ्या संख्येनी एलईडी दिवे व खांब उभारले आहेत. हे सर्व काम ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यांनी सर्व केबल खोदून टाकल्या आहेत. मात्र ही खोदाई व त्याचे काम नगरपरिषदेने दिलेल्या टेंडर मधील अटी व नियमानुसार होत नसून अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.

एलईडी दिव्याच्या भूमिगत केबल जमिनीखाली डीएसआर २०/७/१८ नुसार खोदुन टाकायच्या असे निविदेमध्ये नमूद असतानाही काही ठिकाणी ६ ते ८ इंचापेक्षाही कमी खोदाई करून या केबल टाकण्यात आल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यात काही ठिकाणी या भूमिगत केबल रस्त्यावर आलेल्या स्पष्टपणे दिसत आहेत. यातील काही ठिकाणच्या केबल तीन महिन्यामध्येच उघड्या पडल्या आहेत. त्या रस्त्याच्या वर आल्याने त्यावरून जड वाहने गेल्यास या केबल तुटून विजेच्या प्रवाहाचा धक्का बसू शकतो. यामध्ये जीवितहानी होऊ शकते.

विद्युत विभागाच्या प्रमुख श्रुती ठाकरे यांचेकडे काही नागरिकांनी तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असून प्रशासनाने ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.