Talegaon Dabhade: गोंधळलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे जनतेला नाहक त्रास – किशोर भेगडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या पाठोपाठ आता मावळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे हे देखील गोंधळल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधीना विश्वासात न घेता काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रभावाखाली निर्णय घेत आहेत. त्यामुळे वारंवार निर्णय बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवत आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. तळेगाव शहर परिसरातील जीवनावश्यक सेवा आणि व्यवस्थापनाचे सतत तीन तेरा वाजत आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर लोकांच्या संयमाचा बांध फुटू शकेल, अशी भीती ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी व्यक्त केली आहे. 

शासनाने जारी केलेल्या नियमांच्या विपरीत निर्णय असल्याने जीवनावश्यक सेवा व्यवस्थेचा वारंवार फज्जा उडत आहे. अशी सेवा देणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, दुकानदार, वाहतूकदार आणि भाजीपाला व दूध केंद्र चालक हैराण झाले आहेत. वेळेचे भान न ठेवता अचानक दोन-तीन दिवसांचा स्थानिक लॉकडाऊन जाहीर करणे, रस्ते सीलबंद करताना जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचे व्यवस्थापन लक्षात न घेता सरसकट ढोबळ निर्णय घेणे, लोकप्रतिनिधीनी मागणी करूनही संभाव्य कोरोना प्रादुर्भावाची शक्यता असलेल्या भाजीपाला व दूध हाताळणाऱ्या लोकांची तपासणी न करणे, जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सॅनिटायझिंग टनेल नगरपालिकेच्या दारात लावणे यामुळे लोक हैराण झाले असल्याचे किशोर भेगडे यांनी सांगितले.

आता 17 मेपर्यंत टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. जर मुख्याधिकारी याच पद्धतीने काम करणार असतील तर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पर्यायाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना ते चुकीची माहिती पुरवत राहतील, अशी शंका व्यक्त करून भेगडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे याबाबत संपर्क साधणार असल्याचे सांगितले.

स्थानिक आमदार, नगरसेवक यांना तळेगावातील परिस्थितीची सखोल माहिती असल्याने त्यांच्याशी विचारविमर्श करून निर्णय घेतल्यास जाहीर केलेले प्रशासकीय निर्णय वारंवार बदलण्याची वेळ येणार नाही. रेशनिंग धान्य वाटपात होणारी हेराफेरी, गरजू लोकांना मोफत वाटप करण्यात येणारे अन्नधान्य आणि इतर व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी यापुढे नगरपालिका प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी मागणी किशोर भेगडे यांनी केली आहे.

देहूरोडला जवळ असणारी मामुर्डी, गहुंजे, सांगावडे, साळुंब्रे आदी गावे आताच्या लाॅकडाऊनमध्ये समाविष्ट नसल्याचा उल्लेखही भेगडे यांनी केला.

मुख्य रस्ता बंद शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात – किशोर भेगडे
देहूरोड मधील दोन कोरोनाग्रस्त आढळल्याची घटना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जर प्रवेशद्वारावरच तपासणीची व्यवस्था केली तर अशा बाधितांना सहजपणे शोधून उपाययोजना करता येईल. लिंब फाटा सीलबंद करून प्रादुर्भावाचा बंदोबस्त केल्याचा आभास कामाचा नाही. तो मुख्य रस्ता असल्याने बंद करणे हे शासनाच्या नियमाविरुद्धची कृती आहे. 5 किलोमीटरचा वळसा वडगाव फाट्यावरून मारला तर कोरोना व्हायरस मरतो, असा दावा प्रशासनाचा असेल तर ते दुर्दैव आहे. त्यापेक्षा रस्ता खुला ठेवून तेथे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करणे वैज्ञानिकदृष्टीने अधिक उचित आहे, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.