Talegaon Dabhade : देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बलुतेदारांचे मोठे योगदान – वामन मेश्राम

वामन मेश्राम यांची बलुतेदार पतसंस्थेस भेट

एमपीसी न्यूज- सामाजिक एकोपा जपत देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बलुतेदारांचे योगदान मोठे राहिले आहे. राजकीय आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाताना पुन्हा एक विचाराने संघर्ष केल्यास खरी लोकशाही प्रस्थापित होईल. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी बलुतेदारांसाठी सुरू केलेल्या कामास सदैव साथ दिली जाईल, असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सोमवारी(ता.२) येथे केले. तळेगाव दाभाडे येथील बलुतेदार पतसंस्थेस मेश्राम यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव येथील निवासस्थानी मेश्राम यांचे स्वागत नगराध्यक्षा जगनाडे यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्षा रंजना भोसले, बाळासाहेब मिसाळ, नारायण गायकवाड, रवी पंडागळे, संगीता लोंढे, एस. गेंगजे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. देशातील राजकीय समीकरणांचा पोलखोल करत वामन मेश्राम म्हणाले, “ईव्हीएम घोटाळा हा काँग्रेस आणि भाजपा यांची गेल्या 10 वर्षांपासूनची मिलीभगत आहे. लोकशाहीची जागा ईव्हीएमशाहीने घेतली आहे. प्रादेशिक पक्षांना संपुष्टात आणून सत्ता आणि विरोधीपक्ष म्हणून स्थान प्रस्थापित करण्यासाठी हे दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. मनसे पाठोपाठ आता शिवसेनेलाही संपवण्याची भाजपाची रणनीती आहे. त्यामुळे विधानसभेत भाजपा सेना युती होणार नाही”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आणि संदीप जगनाडे यांनी मोर्चास आर्थिक मदतीचा धनादेश मेश्राम यांच्याकडे सुपूर्द केला. जगदीश डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र पंडागळे, राम गायकवाड, पगारे, दिनेश कोतुळकर, संदीप जगनाडे आदींनी संयोजन केले. दरम्यान, तत्पूर्वी बहुजन क्रांती मोर्चाच्या जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी अशा देशव्यापी रॅलीचे आगमन तळेगाव दाभाडे येथे सोमवारी सकाळी 9 वाजता झाले.

चित्रा जगनाडे- वामन मेश्राम यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

भाजपा नगराध्यक्षा व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची तळेगावातील बलुतेदार पतसंस्थेत झालेली भेट राजकीयदृष्ट्या चर्चेत आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वामन मेश्राम आणि बलुतेदार पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष चित्रा जगनाडे यांच्यात झालेल्या चर्चेने राजकीय गणितात भर पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.