Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे वाॅर्ड क्र. ७ च्या पोटनिवडणुकीत प्रचंड चुरस

राज्यातील महाआघाडीचा परिणाम

एमपीसी न्यूज – येथील  नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ब मधील पोटनिवडणुकीत तीव्र चुरस दिसून येत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा म्हाळसकर आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या जनसेवा विकास समितीने भाजपाची साथ सोडली असून अपक्ष उमेदवारास पुरस्कृत केले आहे.

या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांच्यात दुरंगी लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ चार -पाच दिवसांचा कालावधी राहिला आहे. या प्रभागात फलकेवाडी, पवारचाळ,  टेल्को कॉलनी, म्हाळसकरवाडी, पैसा फंड काच कारखाना, स्वराज नगरी, कोकाटे वस्ती, राजगुरव कॉलनीचा काही भाग यांचा समावेश आहे. या निवडणुकीत संगीता शेळके यांना कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

दोन्ही उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी घराघरांतून संपर्कावर भर दिला आहे. चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी प्रचार पत्रके वाटत आहेत. दोन्ही उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून प्रभागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. संगीता शेळके या माजी नगराध्यक्ष दिवंगत बाळासाहेब शेळके यांच्या सून आहेत. दोन्ही उमेदवार स्थानिक असल्याने अत्यंत चुरस आहे. डाव -प्रतिडाव आखले जात आहेत.

प्रभाग क्रमांक सातमध्ये एकूण ३ हजार ८९३ मतदार आहेत. यामध्ये २ हजार ९४ पुरुष तर १ हजार ७९९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे  विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपाने येथील जागा कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती तसेच जनसेवा विकास समितीने भाजपाच्या ताब्यातील जागा खेचून आणण्यासाठी रणनीती आखली आहे. मतदान ९ जानेवारी  रोजी होणार असून मतमोजणी १० जानेवारी रोजी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.