Talegaon Dabhade : लोकार्पण केलेल्या भुयारी मार्गात पहिल्याच पावसात पाण्याचे तळे

तळेगाव दाभाडे – नुकतेच उदघाटन व लोकार्पण सोहळा करून सुरु करण्यात आलेल्या तळेगाव स्टेशनजवळील भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे हा भुयारीमार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून, या मार्गाने येणा-या दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांची व नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तळेगाव गावभाग ते स्टेशन रस्त्याच्या मध्यभागी स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या भुयारी मार्गाचा लोकार्पण सोहळा नुकताच राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते पार पडला.मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे.

याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव आवारे व लोकप्रतिनिधिनी जागेवर जाऊन पाहणी केली. व या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याविषयी सूचना केल्या. त्यानुसार हे पाणी काढण्यासाठी विद्युत विभागाकडून साडेसात व साडेतीन एचपीच्या दोन विद्युत पंपांद्वारे पाणी उपसण्यात येत आहे. यासाठी बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग व विद्युत विभागाचे अधिकारी जातीने याकडे लक्ष देत आहे. भुयारीमार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था मात्र बांधकाम करताना करण्यात आली नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची व वाहनचालकांची मात्र गैरसोय होत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सदरचा रस्ता अंबिका पार्क काॅलनी रस्त्याला जोडलेला आहे. परंतु काॅलनीचा रस्ता अरुंद आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचा या रस्त्यावर वावर असतो. यामुळे त्या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. हा भुयारी मार्ग सिद्धिविनायक सोसायटी शेजारील डी पी रस्त्याला जोडला तर तळेगाव चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी अधिक उपयुक्त राहील असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.