Talegaon Dabhade : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांमुळे मिळाला महिलेला न्याय

एमपीसी न्यूज – पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी लक्ष घातल्यामुळे एका पीडित महिलेला न्याय मिळाला. पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासापासून तिची सुटका झाली.

तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या संबंधित महिलेचे वधू-वर संस्थेमार्फत दुसरे लग्न झाले. तिचा पती हा तिला कोणतीही आर्थिक मदत न करता महिलेचा फ्लॅट स्वतच्या नावावर करण्यासाठी धमकावत होता. वारंवार महिलेस शिवीगाळ करणे, शारिरिक शोषण करणे, समाजात बदनामी करण्याची धमकी देणे असे प्रकार करीत होता. या सर्व त्रासाला कंटाळून या महिलेने माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांच्याशी संपर्क साधला.

_MPC_DIR_MPU_II

प्रदीप नाईक यांनी संबंधित महिलेला घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात गाठले. या ठिकाणी महिलेने आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी सांगितली आणि पतीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून त्वरित तळेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला व चौकशीचे आदेश दिले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे नारायण पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंदा गावडे यांनी तक्रारीची त्वरित दखल घेऊन गुन्हा दाखल केला.

पोलीस आयुक्त आर. के. पद्ननाभन म्हणाले की, गुन्हेगारीमुक्त पिंपरी-चिंचवड करण्याचा ध्यास बाळगला आहे. महिलांनी अत्याचार सहन न करता अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. संबंधित पीडित महिलेने पोलीस आयुक्त तसेच माहितीअधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1