Talegaon Dabhade : ‘सीआरपीएफ’मधून बडतर्फ केलेल्या महिलेची जवानासोबत हुज्जत, प्रवेशद्वारावर दगडफेक

एमपीसी न्यूज – एका महिलेला ‘सीआरपीएफ’मधून बडतर्फ केल्यानंतर सीआरपीएफ मधील एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची तिने मागणी केली. त्यासाठी तिने तळेगाव येथील सीआरपीएफ कॅम्पच्या गेटवर येऊन जवानासोबत हुज्जत घातली. तसेच गेटवर विटा फेकून मारल्या. ही घटना 23 आणि 27 एप्रिल रोजी तळेगाव सीआरपीएफ कॅम्पच्या गेटवर घडली.

स्नेहा बाबुराव गायकवाड (वय 31, रा. बु-हानगर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सीआरपीएफ शिपाई एन जे विजिकुमार (वय 47) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला स्नेहा 2015 साली तळेगाव सीआरपीएफमध्ये भरती झाली होती. तिच्या गैरवर्तनामुळे तिला 2016 साली सीआरपीएफमधून बडतर्फ  केले होते. त्यावेळी सुभेदार मेजर संजय भुजबळ यांनी तिला वरिष्ठ अधिकारी (डीआयजी) यांच्या समोर हजर केले होते. याचा राग तिच्या मनात होता.

त्यामुळे ती संजय भुजबळ यांचा पत्ता विचारण्यासाठी सीआरपीएफ कॅम्पमध्ये वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून येण्याचा प्रयत्न करीत होती. 23 एप्रिल रोजी सायंकाळी संजय भुजबळ यांचा पत्ता सांग अथवा त्यांच्यावर काय कारवाई केली याची माहिती दे, असे म्हणत आरोपी महिला सीआरपीएफ कॅम्पच्या गेट क्रमांक दोनवर आली होती. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या सहकारी जवानांनी वरिष्ठांना याबाबत सांगून बोलावून घेतले. त्यांनी महिलेच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने चिडून गेटच्या दिशेने विटा फेकून मारल्या.

त्यानंतर आरोपी महिला पुन्हा 27 एप्रिल रोजी सकाळी गेटवर आली. तिने ‘तुम्ही भुजबळ यांना वाचवताय. मला त्यांचा पत्ता द्या. नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही’ असे म्हणत फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घातली. फिर्यादींनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती गेट क्रमांक एक येथून लहान गेटवर चढून आत आली. तिने फिर्यादी यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.