Talegaon Dabhade: जबरदस्तीने लग्न लावलेल्या अल्पवयीन मुलीची ‘विमेन हेल्पलाईन’ने केली पोलिसांच्या मदतीने मुक्तता

एमपीसी न्यूज- जबरदस्तीने लग्न लावलेल्या मावळ तालुक्यातील एका 14 वर्षीय मुलीची ‘विमेन हेल्पलाईन’ या सामाजिक संस्थेने पोलिसांच्या मदतीने सांगली जिल्ह्यातील तिच्या पतीच्या घरातून काल (मंगळवारी) रात्री सुखरूप मुक्तता केली.

पीडित मुलीच्या वडिलांना दारुचे व्यसन असून त्याला वैतागून आई पूर्वीच घर सोडून निघून गेली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांनी एका 30 वर्षीय विवाहीत पुरुषासोबत तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. मुलीने तसेच तिच्या आत्याने केलेल्या विरोधाला न जुमानता सोमवारी सकाळी फुरसुंगी येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घरगुती पद्धतीने लग्न लावण्यात आले.

पीडित मुलीने झाल्या प्रकाराबाबत तिच्या एका मैत्रिणीला माहिती दिली व सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्या मैत्रिणीने मुलीच्या आत्याला कळवले. या प्रकाराची माहिती काहीजणांकडून राजपूत संघटनेचे प्रमुख श्रीराम परदेशी व शिवकुमार बायस यांच्या कानावर आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्रीराम परदेशी यांनी तातडीने ‘विमेन हेल्पलाईन’ संस्थेच्या अध्यक्षा नीता परदेशी यांना मदतीची विनंती केली.

पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव यांनी दैनिक ‘पुढारी’च्या कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर सूत्रे वेगाने हालली. सांगलीच्या जिल्हा पोलीस उपाधीक्षक कृष्णांत पिंगळे यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. जयंत जाधव व नीता परदेशी यांनी त्यांना झाल्या प्रकाराची माहिती देऊन तातडीने हस्तक्षेप करून पीडित मुलीची सुटका करण्याची विनंती केली.

पिंगळे यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी पीडित मुलीला शोधून काढले तसेच तिच्या पतीला व त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. विमेन हेल्पलाईनने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनाही या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार तळेगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आत्याची फिर्याद नोंदवून घेण्यात आली. सांगली पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांनाही सांगलीला बोलवून ताब्यात घेतली.

पीडित मुलीच्या इच्छेप्रमाणे तिला आत्याच्या ताब्यात देण्यात आले असून दोघी परत येण्याच्या मार्गावर आहे. पीडित मुलीने वडिलांच्या घरी जाण्यासाठी नकार दिला असून तिच्या राहण्याची व पुढील शिक्षणाची जबाबदारी विमेन हेल्पलाईनने स्वीकारली आहे, अशी माहिती नीता परदेशी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.