Talegaon Dabhade: वाहतूक पोलिसाला कॉलर पकडून शिवीगाळ; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – ट्रिपल सीट जाणा-या तरुणाला अडविल्याने तरुणाने भर रस्त्यात हुज्जत घालून वाहतूक पोलिसांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच ट्राफिक वॉर्डनला देखील दमदाटी केली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी अकरा वाजता सिंडिकेट बँक चौक, तळेगाव स्टेशन येथे घडली.

समाधान मधुकर बोरुडे (वय 20, रा. वराळे फाटा, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अरुण रावण यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस हवालदार रावण हे देहूरोड-तळेगाव वाहतूक विभागात काम करतात. ते शनिवारी सकाळी तळेगाव स्टेशन येथील सिंडिकेट बँक चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी समाधान हा दुचाकीवरून (एम एच 14 / एफ बी 8983) त्याचे वडील आणि भाऊ यांच्यासोबत ट्रिपल सीट आला. यामुळे रावण हे त्याला थांबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत दंड आकारत होते.

त्यावेळी समाधान याने भर रस्त्यात मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ व दमदाटी करून पोलीस हवालदार रावण यांची कॉलर पकडली. तसेच ट्राफिक वॉर्डन अंबोरे व पाटील यांना देखील दमदाटी केली. फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात समाधान याने अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.