Talegaon Dabhade : तरुणांनी दिले अनोळखी भिकाऱ्याला नवजीवन

एमपीसी न्यूज- एरवी भिकाऱ्याकडे पाहून आपण नाक मुरडतो किंवा त्याला ओलांडून पुढे निघून जातो. पण तळेगावात काही तरुणांनी भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अनोळखी इसमाचा कायापालट करून नवा जन्म दिला. या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तळेगाव रेल्वे स्टेशन येथे मागील दोन महिन्यांपासून एक इसम रोज भिक मागून जे काही मिळेल ते खाऊन तिथेच झोपत असे. त्यामुळे येणारे जाणारे नागरिक त्याच्या जवळून जाण्यास घाबरत असत. हीच गोष्ट तरुणांनी लक्षात घेऊन या इसमाला सामान्य नागरिक बनविण्याचे ठरविले. सदर इसम हा तेलगु भाषा बोलत असल्याने तरुणांना त्यांच्यासोबत अधिक संवाद साधता आला नाही. पण परोपकाराला भाषेची गरज नसते. भावनेमधून काम होते.

महाशिवरात्रीच्या दिवशी या इसमाचे केस कापून त्यांना अंघोळ घालुन त्यांच्या अंगावर चांगले कपडे चढवले. त्यांची थोडीफार आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. आपल्यात झालेला हा बदल पाहुन अनोळखी इसमाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

तळेगावातील गायक अमर वाघमारे, सागर कडलक, वैभव विटे, नागेश दसाडे, मंगेश सांडभोर, शुभम परदेशी, अनिकेत चौरे, दत्ता देवकुळे, नीरज गायकवाड, प्रकाश परदेशी, सौरभ दळवी आणि अभी भोकरे यांनीहे स्तुत्य काम केले. त्याबद्दल शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like