Talegaon Dabhade : निवेदक हा श्रोता आणि वक्ता यांना जोडणारा दुवा – सूत्रसंचालक संजीव सुळे

कलापिनीचे संस्थापक डॉ. शं. वा.परांजपे यांचा स्मृतीदिनानिमित्त सूत्रसंचालन कार्यशाळा

एमपीसी न्यूज- निवेदक हा श्रोता आणि वक्ता यांना जोडणारा दुवा आहे हे कायम लक्षात ठेवायला हवे, उत्तम निवेदक व्हायचे असल्यास निरीक्षण शक्ती, सुंदर भाषा शैली व समृद्ध शब्द संग्रह याची गरज आहे असे मत सुप्रसिद्ध सूत्रसंचालक संजीव सुळे यांनी व्यक्त केले. कलापिनीचे संस्थापक डॉ. शं. वा.परांजपे यांचा स्मृतीदिनानिमित्त ‘आधी केलेची पाहिजे’ या उपक्रमांतर्गत सूत्रसंचालन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सुळे बोलत होते.

या कार्यशाळेला कुमार भवनच्या कुमारांपासून ते नवनवीन गोष्टी शिकण्याची उच्च असलेल्या प्रौढांपर्यंत सगळे उपस्थित होते. ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अडीच तास संजीव सुळे यांनी सूत्रसंचालक कसा असावा, त्याची भूमिका, त्यासाठी आवश्यक अध्ययन याची विस्तृत माहिती दिली.

सुळे म्हणाले, ” तुम्ही काय पाहता, काय ऐकता, काय वाचता यावरून ठरतं की तुम्ही काय बोलू शकणार आहात. उत्तम निवेदक व्हायचे असल्यास निरीक्षण शक्ती, सुंदर भाषाशैली व समृद्ध शब्दसंग्रह याची गरज आहे त्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. निवेदक हा श्रोता आणि वक्ता यांना जोडणारा दुवा आहे हे कायम लक्षात ठेवायला हवे” सुळे यांनी देहबोली, आवाजफेक ते अगदी वेशभूषेपर्यंतचा आढावा घेतला.

कलापिनीचे विश्वस्त डॉ. परांजपे यांनी प्रास्ताविक केले. कै. डॉ. शं. वा. परांजपे यांच्या काळापासून कलापिनीच्या सर्व कार्यक्रमासाठी मंडप व आसन व्यवस्था सांभाळणाऱ्या किशोर कसाबी यांचा व कलापिनी युवा कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून चेतन पंडित यांचा संजीव सुळे यांचे हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन अशोक बकरे, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे यांनी केले, ध्वनी व्यवस्था चेतन पंडित आणि सहकाऱ्यांनी सांभाळली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.