Talegaon Dadhade: माळवाडी येथे राहणाऱ्या ‘कोरोना योद्धा’ नर्सला कोरोनाचा संसर्ग, इंदोरी पण कंटेनमेंट झोनमध्ये

Talegaon Dadhade: Corona warrior nurse living in Malwadi infected with corona

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या आणखी एका नर्सला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तीन दिवसांपूर्वी तळेगावमध्ये एक संशयित कोरोनाबाधित नर्स सापडली होती. आता तळेगाव शेजारीच असलेल्या माळवडी येथे राहणारी एक 37 वर्षीय नर्स कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने तळेगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नर्स पुण्यात शिवाजीनगर येथील एकाच रुग्णालयात कामाला आहेत. या दुसऱ्या नर्सला देखील पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तळेगाव, माळवाडी माळवाडीबरोबरच आता इंदोरीचा देखील प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) समावेश करण्यात आला आहे. 

या बाबतची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गट विकास अधिकारी शरद माळी व तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी माळवडी येथे जाऊन संबंधित नर्स राहात असलेल्या परिसराची पाहाणी केली. त्यावेळी माळवाडीचे सरपंच सुनील दाभाडे व पोलीस पाटील रवींद्र दाभाडे उपस्थित होते.

या नर्सच्या कुटुंबातील पती व दोन मुलगे यांना देखील पुण्याच्या रुग्णालयात पाठविण्यात आले असून जवळचा संपर्क असल्याने त्यांचीही कोरोना निदान चाचणी करवून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या व्यतिरिक्त संबंधित नर्स आणखी कोणा-कोणाच्या संपर्कात आली होती, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

तळेगाव स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका 34 वर्षीय नर्सच्या खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोना निदान चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आदेश काढून तळेगाव दाभाडे, तळेगाव स्टेशन, वराळे, माळवाडी, कातवी, आंबी, वारंगवाडी, कोटेश्वरवाडी, सीआरपीएफ कॅम्प तसेच वडगावचा काही भाग पुढील आदेश मिळेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला होता. सोमाटणे, इंदोरी, परंदवडी आदी ठिकाणी बफर झोन जाहीर करण्यात आला होता.

आता इंदोरीही कंटेनमेंट झोनमध्ये

दुसरी नर्स कोरोनाबाधित नर्स माळवाडी येथे राहणारी असल्याने इंदोरीचाही समावेश प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात आला आहे. सुदवडी, सुदुंबरे जांबवडे व नाणोलीचा बफोर झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दोन्ही नर्स पुण्यात शिवाजीनगर येथील रुग्णालयात काम करून रात्री मुक्कामाला तळेगाव व माळवडी येथे येत असत. तळेगावच्या नर्सच्या शासकीय प्रयोगशाळेतील कोरोना निदान चाचणीचा अहवाल अद्यापि प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले. तिच्या संपर्कात आलेल्या एकूण 38 जणांचे तळेगावमध्येच संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी जवळच्या संपर्कातील सहाजणांचे स्वॅब कोरोना निदान चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

माळवाडी येथील नर्सचे घर एका चाळीत असल्याने तसेच चाळीतील रहिवासी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करीत असल्याने काळजी व्यक्त करण्यात येत आहे. माळवाडीच्या नर्सच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांचेही संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे.

कोरोना योद्धा म्हणून त्यांचा आदर ठेवा – सुनील शेळके

मावळ तालुक्यातील संबंधित दोन्ही नर्स या कोरोना योद्धा आहेत. जीवाची जोखीम पत्करून रुग्णसेवा करताना त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांच्याविषयी तालुक्यातील सर्वच नागरिकांनी आदराची भावना ठेवून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, म्हणून प्रार्थना करावी, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका, मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी, अशी विनंती त्यांनी मावळवासीयांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.