Talegaon : भर दिवसा दरोडा टाकणारी टोळी गजाआड; पाच आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे (Talegaon) येथे भर दिवसा पडलेल्या दरोड्यातील पाच आरोपीना पिंपरी चिंचवड युनिट शाखा तीनने गजाआड केले. तसेच, पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड करुन 19 तोळे सोन्याचे दागिने म्हणजेच एकूण 25.27 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची यशस्वी कामगिरी केली. 

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 जानेवारी रोजी दुपारी पाच जणांनी भर दिवसा दरोडा टाकला. यामध्ये 24 तोळे सोने व रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान ऐवज चोरी करण्यात आले होते.

या प्रकरणी अमर दहातोंडे (वय 20 वर्षे रा. वडाळा, अहमदनगर; सध्या रा. चिंबळी फाटा, खेड), मस्के (वय 30 वर्षे, रा. बर्गे वस्ती, ता. खेड), राजू यादव (वय 42 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे), सोपान ढवळे (वय 24 वर्षे, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ लोणार. जि. बुलढाणा) आणि प्रशांत काकडे (वय 30 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे) या पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे.

यामधील राजू यादव हा अलिबाग पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपी असून तो 2020 रोजी जामिनीवर सुटला आहे. तसेच, आरोपी अनिल मस्के हा देखील जामिनावर सुटलेला गुन्हेगार आहे. असे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, की (Talegaon) राजू यादव आणि सोपान ढोले यांना हॉटेल व्यवसाय करण्यासाठी पैशांची गरज होती. पैशांची जमवाजमव करताना त्यांच्या लक्षात आले, की तळेगाव परिसरात फिर्यादी यांचे पूर्वी गुटख्याचे दुकान होते. त्यांच्याकडे काळा पैसा दडवून ठेवला आहे. त्यामुळे आरोपीनी कट करून हा दरोडा टाकल्याचे कबूल केले.

ही कारवाई करत असताना पोलिसांनी आयुक्तालय हद्दीतील चाकण, आळंदी, दिघी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तळेगाव दाभाडे परिसरातील एकूण 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचीही कबुली आरोपीनी दिली. या आरोपीना आता अटक करण्यात आली असून त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 395, 452, 323, 506(2), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1)( 3) सह 135, शस्त्र अधिनियम 3 25, 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahindra : महिंद्राने केली पहिल्या सी-सेगमेंट इलेक्ट्रिक एक्सयूव्ही 400 च्या किंमतीची घोषणा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.