Talegaon Dabhade : उपनगराध्यक्षपदी तळेगाव शहर विकास समितीच्या वैशाली प्रमोद दाभाडे विजयी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे उपनगराध्यक्षपदी तळेगाव शहर विकास समितीच्या वैशाली प्रमोद दाभाडे विजयी झाल्या. तळेगाव शहर सुधारणा विकास समिती व जनसेवा विकास समिती यांनी एकत्र येत या निवडणुकीमध्ये भाजपाला एकटे पाडून विजय प्राप्त केला. जनसेवा विकास समितीचे नगरसेवक संग्राम काकडे यांनी उपनगराध्यपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज, शुक्रवारी ही निवडणूक झाली.

उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगरपरिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी पिठासन अधिकारी म्हणून काम पहिले तर मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी त्यांना साहाय्य केले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भारतीय जनता पक्ष आणि जनसेवा विकास समिती यांची सत्ता असली तरी या उपनगराध्यपदाच्या निवडणुकीत जनसेवा विकास समिती काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

उपनगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून शोभा अरूण भेगडे यांनी उमेदवारी अर्ज भरला तर तळेगाव शहर सुधारणा विकास समितीकडून वैशाली प्रमोद दाभाडे यांनी अर्ज भरला. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी उमेदवारी माघारी घेण्याची विनंती भाजपाकडे केली. परंतु माघार न घेता निवडणूक झाली. यावेळी हात वर करून मतदान घेण्यात आले. शोभा भेगडे याना अध्यक्षासह 13 मते पडली व वैशाली दाभाडे यांना 14 मते पडल्यामुळे वैशाली दाभाडे यांना विजयी घोषित करण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके व उपस्थित सर्व नगरसेवकांनी वैशाली दाभाडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

वैशाली दाभाडे यांच्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे. पक्षीय संघटना तसेच लोकसभा व विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये व सामाजिक क्षेत्रात त्यांचा असलेला सक्रिय सहभाग यामुळे सर्व स्तरांमधून या निवडीचे स्वागत होत आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून खुल्या महिला प्रवर्गामधून निवडून आलेल्या वैशाली प्रमोद दाभाडे या पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून सक्षमपणे पक्षाची जबाबदारी निभावत आहेत. अनेक सामाजिक संस्थावर त्या कार्यरत आहेत, अभ्यासू आक्रमक व कुशल संघटक म्हणून त्या सुपरिचित आहेत. तर शैक्षणिक, कला, क्रीडा, या क्षेत्राशी संबंधित आहेत.

दाभाडे कुटुंब विशेषतः त्यांचे सासरे अण्णासाहेब कोंडीबा दाभाडे यांचे सहकार आणि सामाजिक,अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम काम असून तळेगांव दाभाडे गाव आणि स्टेशन नव्हे तर पंचक्रोशीत आपल्या सामाजिक कामातून समाजाची बांधिलकी जपत आहेत त्यामुळेच सर्व कुटुंबांशी सलोख्याचे संबंध असणारा हा परिवार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like