Talegaon: पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करत खूनी हल्ला; सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर सात जणांनी मिळून खूनी हल्ला केला. तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. याप्रकरणी सात जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. ही घटना शनिवारी (दि. 14) सायंकाळी साडेसातच्या सुमारास परंदवडी सोमाटणे रोडवरील मुंजा ओढ्याजवळ घडली.

रोहन दिनकर गराडे (वय 19, रा. धामणे, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य विलास गराडे (वय 17) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रसाद ऊर्फ पर्शा देंभेकर (रा. उर्से), आकाश साळुंखे (रा. चौराईनगर, सोमाटणे फाटा), केतन पोकळे (रा. सोमाटणे फाटा), हर्षद भोकरे (रा. शिवणे), अनु उर्फ अनुराधा काळे (रा. तळेगाव दाभाडे) आणि अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी रोहन आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रोहन आणि आदित्य त्यांच्या मोपेड दुचाकीवरून ब्लू डार्ट कंपनीचे चहाचे पार्सल घेऊन जात होते. ते परंदवडी सोमाटणे रोडवरील मुंजा ओढ्याजवळ वसंत पापळ यांच्या प्लॉटिंगजवळ आले असता आरोपी तीन मोटारसायकलवरून आले.

आरोपी प्रसाद याने लोखंडी कोयत्याने रोहनच्या डोक्यात आणि हातावर सपासत वार केले. त्यानंतर केतन पोकळे याने कोयता घेतला आणि त्याने देखील रोहनवर वार केले. अन्य आरोपींनी रोहनला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. सर्वांनी मिळून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये रोहन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड विधान 307 अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा तसेच भारतीय दंड विधान कलम 143, 147, 148, 149, 323, आर्म अॅक्ट 4 (25), महाराष्ट्र पोलीस कायदा 37 (1), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.