Talegaon : बाहेरून येणाऱ्यांचे तळेगावात विलगीकरण नको; पास नसल्यास गुन्हे दाखल करा – गणेश काकडे

एमपीसी न्यूज – शहराच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे विलगीकरण तळेगावात करू नका. तसेच यापुढे शहरात येणाऱ्या नागरिकांकडे जर शासनाचा योग्य पास नसेल तर त्या नागरिकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते व तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना काकडे म्हणाले की, तळेगावात चांगल्या प्रकारची वातावरण निर्मिती झाली असून सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते, नेते, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते एक दिलाने आपापल्या परीने काम करीत आहेत. लाॅकडाऊन झाल्यापासून नागरिक शासनाच्या आदेशानुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. आतापर्यंत तळेगाव परिसरात कोरोना विषाणूचा संसर्गजन्य रूग्ण सापडलेला नाही.

आम्ही सर्वजण याबाबत कसोशीने प्रयत्न करत आहोत. बुधवारी (दि. 29) रोजी घाटकोपर येथून आलेल्या नागरिकांना तळेगाव या ठिकाणी क्वारांटाइन केले आहे. अशा प्रकारे शहराच्या बाहेरून येणा-यांचे विलगीकरण तळेगावात करू नये. आम्ही सर्वच तळेगावकर याबाबतीत काळजी घेत आहोत, एवढे प्रयत्न करूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर तळेगाव व परिसराच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे.

त्याचबरोबर तळेगावात या पुढे रात्री अपरात्री येणा-या बाहेरील नागरिकांकडे शासनाने दिलेला पास नसेल तर अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करावेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आमचा विरोध असेल,असे काकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.