Talegaon : ‘फत्तेशिकस्त’….एक सर्वांग सुंदर अनुभव!

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज – नुकताच रिलीज झालेल्या ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तळेगावातील सुपुत्र आणि कलाकार विशाल बोडके आणि गणेश तावरे यांनी. याविषयी त्यांनी अनुभव मांडले.

भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईक वरच्या चित्रपटात मला भूमिका साकारायला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, त्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याचा अनुभव खूपच खास होता, असे मत या सिनेमात शाहीर आणि सरदार चांद्जी जेधे यांची भूमिका केलेल्या तळेगावातील सुपुत्र अन हरहुन्नरी कलाकार विशाल बोडके यांनी व्यक्त केले.

तसेच हा अनुभव खूप काही शिकवून ही गेला आणि भालजी पेंढारकर न सारख्या दिग्गज दिग्दर्शकासह काम करण्याचा अनुभव जरी नाही मिळाला तरी आम्ही दिग्पाल लांजेकर यांच्या बरोबर इतिहासाच्या या समरांगणात छोटीशी आहुती देऊ शकलो, हे आमच भाग्य आहे, असे मत याच कलाकृतीतील अभिनेते गणेश तावरे यांनी व्यक्त केले.

तावरे पुढे म्हणाले कि , ‘फर्जंद’सारखी कलाकृती २६ वेळा पाहिल्यानंतर आपण ही याचा भाग व्हावं, अशी इच्छा मनोमन राखलेली होती. त्यासाठी प्रयत्नही केले आपल्या परीने. त्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्याला ‘फत्तेशिकस्त’मध्ये सहभागी होण्याची संधी दिली आणि एका वेगळ्याच दुनियेत एका परिपूर्ण कलाकृतीत सहभागी झाल्यामुळे आपण कृतकृत्य झालो.

अभिनेते गणेश तावरे यांनी फक्त भूमिकाच केलेली नाही तर, ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटासाठी जे जे लागेल त्यासाठी सहाय्यही केले आहे. जसे की , महाराजांनी वापरलेली मुळची धोप तलवार या चित्रपटासाठी तावरे यांनी उपलब्ध करून देण्यात सिहाचा वाटा उचललेला आहे.

चित्रपटातला अनुभव शेअर करताना गणेश यांनी सांगितले कि, दररोज चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी आणि संपल्यावर शिवाजी महाराजांची आरती व्हायची आणि त्यानेच संपूर्ण वातावरण भारलेल असायचं. या दरम्यान कोणी ही कसलच व्यसन करत नव्हता. महाराजांना अपेक्षित वर्तवणूक सगळ्यांनीच काटेकोरपणे पाळण्याचा संकल्प केला आणि तो पाळला ही असे दोन्ही अभिनेत्यांनी सांगितले.

या चित्रपटासाठी, या संकल्पासाठी तळेगाव दाभाडे राजघराण्यातील सत्यशीलराजे दाभाडे आणि त्यांच्या मातोश्री वृषालीराजे दाभाडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच १२ मावळ सरदारांच्या घराण्यांनी याला पाठबळ दिले आणि त्यामुळेच ही कलाकृती जन्मास आली. त्यामुळे ती आता रसिकांच्या पाठबळाने अजरामर होणार आहे, अशी भावना विशाल बोडके आणि गणेश तावरे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.