Talegaon : देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फेसबुकवर वादग्रस्त प्रतिक्रिया देणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करा -गणेश भेगडे

एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फेसबुक पेजवरील एका पोस्टवर वादग्रस्त प्रतिक्रिया देणाऱ्या इसमाविरोधात सायबर क्राईम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, फेसबुकवर ‘एक कोटी सुप्रिया सुळे व अजित पवार’ या नावाचे पेज चालविले जाते. त्या पेजवर सागर पिसे नावाच्या एका इसमाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये ” कोरोना विरुद्ध लढाई ” मात्र, फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी भवनातच दिसतात…. गृहमंत्री ” अशा आशयाची पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टला ब-याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातच दिलीप बोचे नावाच्या इसमाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली आहे.

वास्तविक पाहता कोरोनाच्या संबंधाने देश संकटात आहे. अशा पध्दतीने बेताल प्रतिक्रिया देऊन सामाजिक तेढ निर्माण होऊन शांतता भंग होत आहे. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिलीप बोचे याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

बोचे याच्या विरुद्ध ‘सायबर क्राईम’ कायद्यांर्तगत गुन्हा दाखल करण्यात यावा व तातडीने कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना पुणे जिल्हा भाजपाचे सचिव अविनाश बवरे व मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.