Talegaon : तळे उत्खननातील दोषींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा – स्थायी सभेत मागणी

File a criminal case against the culprits in the pond excavation - demand in the standing meeting : तहसिलदारांच्या आदेशावर न्यायालयात अपील दाखल करा

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत तळे उत्खन्नबाबतच्या तहसिलदारांच्या आदेशावर न्यायालयात अपील दाखल करण्यास तसेच या प्रकरणात दोषी असणारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सभेत करण्यात आली.

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दि. 1 जुलै रोजी तळे उत्खननाबाबत दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतर त्यावर अपील व त्या अनुषंगानेे करावयाची कार्यवाही यासाठी स्थायी समितीची सभा नगरपरिषद सभागृहात गुरूवार (दि.9) आयोजित करण्यात आली होती.

सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या.

यावेळी स्थायी समिती सदस्य वैशाली दाभाडे, गणेश खांडगे, अरुण भेगडे पाटील, सुलोचना आवारे, शोभा भेगडे, किशोर भेगडे, काजल गटे, मंगल जाधव, गणेश काकडे तसेच मुख्याधिकारी दीपक झिंजाड व बांधकाम अभियंता मलिकार्जुन बनसोडे आदी उपस्थित होते.

सभेचे कामकाज सुरु होताच सदस्यांनी नगराध्यक्षांवर गौण खनिज उत्खननाबाबत प्रश्नांचा भडीमार करीत धारेवर धरले. यावेळी गटनेता किशोर भेगडे यांनी गौण खनिज उत्खनन प्रकरणामध्ये जे अधिकारी, पदाधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली.

गणेश खांडगे म्हणाले, या प्रकरणाशी संबधित असलेले तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व संबधित दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मंजुरी न घेता काढलेली बिले संबाधीताकडून वसूल करून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी.

तर सुलोचना आवारे म्हणाल्या, नगरसेवक व नागरिकांना दंडाच्या प्रकरणी वेठीस धरू नका. वैशाली दाभाडे म्हणाल्या, सत्ताधारी पक्षाकडून या प्रकरणी एवढ्या मोठ्या रकमेचे चेक काढले गेले त्यावेळी त्यांनी आक्षेप का घेताला नाही, असा सवाल केला.

शोभा भेगडे म्हणाल्या, या प्रकरणात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी. नागरिकांना याचा भुर्दंड बसता कामा नये.

दरम्यान, या चर्चेनंतर विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहाबाहेर पडल्याने पुढील कामकाज समाप्त झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.