Talegaon : सोशल मीडियावरील पोस्टवरून दोन गटात झालेल्या राडाप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – व्हाट्सअपवर टाकलेल्या वर्चस्वाच्या पोस्टवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये तीन कारची तोडफोड करण्यात आली असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज, सोमवारी (दि. 11) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथे शुभम कॉम्प्लेक्स समोर घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

योगेश गायकवाड असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर तळेगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कांब्रे कामशेत येथील देवा गायकवाड आणि हरनेश्वरवाडी तळेगाव स्टेशन येथील सांडभोर या दोन गटात दुपारी दोनच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. व्हाट्सअपवर वर्चस्वाच्या पोस्ट वरून सुरुवातीला वाद झाला. सांडभोर गटाने गायकवाड गटाला तळेगाव स्टेशन येथे बोलावून घेतले. गायकवाड गट तळेगाव स्टेशन येथे आला असता दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले, “गायकवाड आणि सांडभोर यांच्यामध्ये व्यावसायिक देण्यावरून मागील काही दिवसांपासून वाद होते. आर्थिक व्यवहाराची बोलणी करण्यासाठी भेटण्याचे ठरवून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते तळेगाव स्टेशन येथे भेटले. एकमेकांशी बोलत असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. जवळच उभा केलेल्या कारवर दगड मारला असता तो दगड उडून योगेशला लागला आहे. सांडभोर गटातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.