Talegaon : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या तळेगाव मधील गणेशोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज – ऐतिहासिक परंपरा (Talegaon ) लाभलेल्या तळेगाव दाभाडे शहरातील गणेशोत्सवाची सातव्या (सोमवार, दि. 25) दिवशी जल्लोषात सांगता झाली. ढोल-ताशा अशा पारंपारिक वाद्यांसह डीजेच्या तालावर श्री गणेशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता सुरु झालेली विसर्जन मिरवणूक रात्री बारा वाजता संपली.

सोमवारी सायंकाळी सहा वाजता पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी, श्री डोळसनाथ तालीम मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील भेगडे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते आरती करून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश भक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी रिमझिम पावसाने देखील हजेरी लावली.

Wakad : महिलेला तलवार व दगडाने मारहाण; एकाला अटक

तळेगाव मधील विसर्जन सोहळ्याला ऐतिहासिक परंपरा

तळेगाव दाभाडे शहरातील गणेशोत्सव सात दिवसांचा असतो. सातव्या दिवशी तळेगावातील गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जातो. या सोहळ्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. राजघराण्यातील गणेश विसर्जन झाल्यानंतर शहरातील विसर्जन सोहळ्याला सुरुवात होते.

पालखीचा मान असलेल्या राजघराण्यातील गणेश विसर्जन सोहळा झाल्यानंतर दुपारी एक वाजता शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी आपल्या विसर्जन मिरवणूका सुरू केल्या. तसेच दुपारी तीन वाजल्यापासून घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. नगरपरिषदेने विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या विसर्जन कुंडात नागरिकांनी बाप्पाचे विसर्जन केले. तर काही भाविकांनी नगरपरिषदेच्या मुर्तीदान केंद्रावर मुर्तीदान करत बाप्पाला निरोप दिला.

तळेगाव मधील मानाचे गणपती – Talegaon 

मिरवणुकीच्या अग्रभागी श्री डोळसनाथ महाराज मंदीराचा मानाचा पहिला गणपती होता. टॅक्टरवर आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच मंडळाच्या मिरवणूकित ढोल लेझीम पथक सज्ज होते. त्या पाठोपाठ दुसरा मानाचा गणपती कालिका गणेशोत्सव मंडळ, तिसरा मानाचा गणपती तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चौथा मानाचा गणपती राजेंद्र चौक गणेशोत्सव मंडळ, पाचवा मानाचा गणपती गणेश तरुण मंडळाचा होता. यानंतर इतर सार्वत्रिक मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतला. गावातील इतर भागातून देखील वाजत गाजत मंडळांनी मिरवणुका काढल्या. शाळा चौक येथे नगर परिषदेने स्वागत कमान उभारून सर्व मंडळांचे स्वागत केले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान (Talegaon) पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. तळेगाव मधील विसर्जन मिरवणुकीसाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यासह बाहेरून देखील मनुष्यबळ मागवण्यात आले होते. पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने आदि वरिष्ठ अधिकारी मिरवणुकीदरम्यान उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.