Talegaon: पोस्ट ऑफीसला जागा द्या, नगरसेवक निखील भगत यांची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफीसला नगरपरिषदेने भाडेतत्वार तत्काळ जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी नगरसेवक निखील भगत यांनी केली आहे. तपोधाम कॉलनीतील नगरपरिषदेच्या मालकीची इमारत मध्यवर्ती ठिकाणी असून तळेगाव स्टेशन पासून जवळ आहे. या इमारतीचा पोस्ट ऑफीससाठी विचार करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, सुरेश दाभाडे, रविंद्र आवारे, विश्वास देशपांडे, चंदन कारके, संविद पाटील आदी उपस्थित होते. निवदेनात नगरसेवक भगत यांनी म्हटले आहे की, मागीलवर्षी रस्ता रुंदीकरण आणि अनधिकृत बांधकामाच्या कारवाईत तळेगाव स्टेशन येथील पोस्ट ऑफीस नगरपरिषदेकडून पाडण्यात आले. या पोस्ट ऑफीसमार्फत अनेक ज्येष्ठ नागरिक, पिग्मी कलेक्शन एजंट, खातेदार आदींकडून ठेवी, पगार, पेन्शन, पत्रव्यवहार केले जातात. स्टेशन येथे पोस्ट ऑफीस नसल्याने नागरिकांना तीन किलोमीटर लांब जाऊन व्यवहार करावे लागत आहेत.

खातेधारकांची समस्या सोडविण्यासाठी पुणे ग्रामीण डाकघर अधीक्षकांसोबत झालेल्या पत्रव्यवहार मुख्याधिका-यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. यामध्ये पोस्ट खात्याने भाडेतत्वाने पोस्ट ऑफीसला जागा दिल्यास पोस्ट खाते भाडे भरावयास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पोस्ट ऑफीससाठी तपोधाम कॉलनीमधील नगरपरिषदेच्या इमारतीचा विचार करावा, अशी विनंती नगरसेवक भगत यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.