Talegaon : गटविकास अधिकाऱ्यांसह वाहनचालकाला मारहाण

Group development officer and his driver beaten : मारहाण करणाऱ्या तरुणविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांसह त्यांच्या वाहनचालकाला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण करण्यात आली. सोमवारी (दि.२७) सायंकाळी सहा वाजता सोमाटणे ग्रामपंचायत कार्यालय येथे ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तरुणविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सरकारी वाहनचालक शिवाजी पांडुरंग पाटील (वय ५५ रा. चौधरी पार्क दिघी पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

त्यानुसार स्वप्नील अरुण लांडे (वय ३५ रा. सोमाटणे ता. मावळ) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार सोमाटणे ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याबाबत आढावा घेण्यासाठी मावळ गटविकास अधिकारी सुधीर भागवत सोमवारी सोमाटणे गावात गेले होते.

ग्रामपंचायत कार्यालयात आढावा घेत असताना त्यांचा वाहनचालक शिवाजी पांडुरंग पाटील यांना आरोपी स्वप्नील लांडे याने तोंडाचा रुमाल आवळून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. झटापट सोडवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधीर भागवत आले असता त्यांनाही मारहाण व दमदाटी करण्यात आली.

दरम्यान, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र वाघमारे, लिपिक जीवन गायकवाड, शिपाई कैलास तुकाराम मुऱ्हे घटनास्थळी धावून आले. त्यानंतर आरोपी लांडे याला पकडून ग्रामपंचायत कार्यालय कोंडले.

त्याला विचारपूस केली असता, माझी आई कोरोना पॉझिटिव्ह असून माझ्या आईला घेऊन जाण्यासाठी आले असल्याचा संशय आल्याने मी शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचे आरोपी लांडे याने सांगितले.

दरम्यान, आरोपी लांडे हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे  डॉक्टरांनी  सांगितले.  पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.