Talegaon : जमिनीच्या वादातून सालकरी महिला कामगाराचा विनयभंग

एमपीसी न्यूज – सालाने काम करणाऱ्या महिलेच्या जमीन मालकासोबत एकाचा जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. या वादातून एकाने सालाने काम करणाऱ्या एका महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच कामगार महिलेच्या पतीलाही शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी (दि. 28) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेने शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक पुरुष (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचे पती दारुंब्रे येथील एका शेतात सालाने काम करतात. ते शेतामध्ये असलेल्या एका खोलीत दोन मुलांसह राहतात. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी पीडित महिला काम करत असलेल्या शेतात आला. आरोपी आणि पीडित महिलेच्या शेत मालकाचे जमिनीच्या कारणावरून वाद सुरू आहेत.

त्या वादातून आरोपी फिर्यादी यांना म्हणाला की, तुम्ही येथे राहायचे नाही. त्यावर फिर्यादी यांनी आरोपीला समजावले की, आम्ही शेतमालकाकडे सालाने काम करतो. त्यांच्याकडून आम्ही उचल घेतली आहे. ती फेडल्यानंतर आम्ही निघून जातो. त्यावर आरोपीने पीडित महिलेशी गैरवर्तन करत विनयभंग केला. याचा पीडित महिलेच्या पतीने आरोपीकडे जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.