Talegaon News : जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी अप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज –  युवकांनी मोबाईलचा जास्त वापर करू नये.(Talegaon News) त्याऐवजी हातात पुस्तके पकडावीत. कारण मोबाईल आत्महत्या करण्यास परावृत्त करतो, तर पुस्तके आयुष्याची घडी बसवतात, असे प्रतिपादन लेखक प्रा. नामदेवराव जाधव यांनी केले. 

 

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी अप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. तळेगाव दाभाडे येथील हॉटेल इशा येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. जाधव बोलत होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद होते. यावेळी सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त किरण काळे, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे, तिन्ही संस्थांचे अध्यक्ष संतोष खांडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष विल्सेंट सालेर, मिलिंद शेलार,दादासाहेब  उऱ्हे, विलास भेगडे, कैलास काळे, बाळासाहेब शिंदे, सुदाम दाभाडे आदी उपस्थित होते.

 

सुनंदा काकडे यांचा राजमाता जिजाऊ समाजरत्न पुरस्काराने, शिल्पा रोडगे यांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने, तर शांताई आदर्श माता पुरस्काराने शकुंतला फलके यांचा गौरव करण्यात आला. याबरोबरच कर्तृत्ववान ज्येष्ठ महिला पुरस्कारही प्रदान करण्यात आले.(Talegaon News) शैक्षणिक क्षेत्रासाठी विजया इनामदार, कृषी क्षेत्रासाठी अनुपमा दाभाडे, साहित्यिक क्षेत्रासाठी मीनाक्षी भरड, सांस्कृतिक क्षेत्रासाठी रश्मी पांढरे, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. शैलजा पवार, सहकार क्षेत्रासाठी अरुणा ढाकोळ, उद्योग क्षेत्रासाठी मंगलाताई भोमे, सांप्रदायिक क्षेत्रासाठी पार्वतीबाई भेगडे यांना, तर उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार वीरांगना महिला विकास संस्थेला प्रदान करण्यात आला.

Pune : डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाईनतर्फे डिझाईन समिटचे आयोजन

प्रा. जाधव म्हणाले, की शिवाजी महाराजांची स्मृती जागवायची असेल, तर प्रथम आपल्या भाषेचा आपणास अभिमान हवा. शिवाजी या नावातच ‘शिका, वागा व जग जिंका’, असे अभिप्रेत आहे. मराठी माणसाने प्रथम शहाजी आणि जिजाई व्हावे. मराठी माणसाने प्रथम शिवाजी महाराजांचे चरित्र समजून घ्यायला पाहिजे व आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवले पाहिजे. शिवाजी महाराजांनी कमी वेळात कमी खर्चात कमी माणसांमध्ये आपल्या मोहिमा फत्ते केल्या. राजमाता जिजाऊ यांचे योग्य मार्गदर्शन शिवाजी महाराजांना बहुमोलाचे ठरले. आई व मुलाचे नाते कसे असावे, याचे उत्तम उदाहरण राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज होते.

 

बाळासाहेब काशीद म्हणाले की, समाजाला प्रेरणा देण्याचे काम पुरस्कारांमधून होत असते. जगद्गुरू तुकाराम महाराजांनीही आपल्या अभंगांतून कन्येचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे पुरस्कारप्राप्त महिलांची समाजाप्रती जबाबदारी अधिक वाढली आहे.

 

रामदास काकडे यांनी मोलमजुरी करणाऱ्या महिलांना कष्टाच्या प्रमाणात मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत जगाला अन्नधान्य पुरविण्यात महिलांचा सहभाग अतुल्य असल्याचे सांगितले.(Talegaon News) या पुरस्कारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कार्यकर्तृत्वाचा गौरव झाला आहे.

 

गणेश खांडगे यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणाऱ्या महिला नेहमीच उच्च स्थानावर राहिल्या असून, स्त्री शक्तीचे महत्त्व मोठे आहे. किरण काळे यांनी सांगितले, की महिलांनी आज सर्वच क्षेत्रात ठसा उमटवला असून, नारीशक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला आहे.

 

पुरस्काराला उत्तर देताना शकुंतला फलके, सुनंदा काकडे, शिल्पा रोडगे, डॉ. शैलजा पवार यांनी पुरस्कारामुळे समाजाप्रती आणखी खूप काही करून दाखविण्यासाठी ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. या विशेष पुरस्कारामुळे विशेष आनंद असून, सर्व सहकारी कर्मचारी वर्गाचा हा सन्मान असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संतोष खांडगे यांनी महिलांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांमागची पार्श्वभूमी सांगितली. तसेच प्लास्टिकचे पर्यावरणावर होत असलेले गंभीर परिणाम (Talegaon News) लक्षात घेऊन जनजागृती मोहीम हाती घेणार असून, या अंतर्गत पहिल्या टप्प्यात तळेगावमधील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन कापडी पिशव्या देऊन प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण मावळ तालुक्यातील शाळांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका कुसुम वाळुंज व लक्ष्मण मखर यांनी, तर आभार शंकर हदीमनी यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.