Talegaon : मागील पाच वर्षात किती नोकऱ्या दिल्या हो मुख्यमंत्रीसाहेब? -मावळमधील तरुणाईचा सवाल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण बेरोजगारांची चेष्टा लावली आहे की काय?, अशी शंका सध्या तरुणवर्गाला येत आहे. कारण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत सुटलेल्या मुख्यमंत्र्यांच्या खोटे बोलण्याला काही मर्यादाच राहिली नाही, असे दिसते. नुकतीच मावळात झालेल्या जाहीर सभेदरम्यान त्यांनी येत्या पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगार देण्याचे जाहीर केले. मागील पाच वर्षात किती तरुणांना नोकऱ्या दिल्या हो मुख्यमंत्री साहेब ? हा प्रश्न संतप्त तरुणवर्गात विचारला जात आहे. 

पाच वर्षांपूर्वीही निवडणुकीत दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याच्या गप्पा मारल्या गेल्या होत्या. दरवर्षी करोडो तरुणांच्या हातून नोकरी जात आहे, हे वास्तव चित्र असतानाही मुख्यमंत्री फडणवीस हे खऱ्या आकड्यांची लपवाछपवी करत असल्याचे दिसते. अर्थव्यवस्थेतील चुकीच्या धोरणांमुळे मावळ तालुक्यासह राज्यातील अन्य तालुक्यातून लहान, मोठे उद्योगधंदे स्थलांतरीत होत आहेत. विविध कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे हजारो-लाखो तरुणांच्या हातचे काम निघून गेले असून बेरोजगारीच्या विळख्यात सुशिक्षित तरुणवर्ग सापडला आहे.

अशिक्षित, अकुशल कामगारांचे तर हालच विचारू नका. पुण्यासारख्या शहरात रोजगाराची मोठी संधी आहे, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आय टी पार्कमधील किती कंपन्यांनी स्थलांतर केले आहेत, किती कंपन्या बंद पडल्या आहेत?, याचाही खुलासा करावा, असे तरुणांचे म्हणणे आहे.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडिया’ या संस्थेच्या सर्व्हेनुसार भारतात दरवर्षी १ कोटी ६० लाख तरुण नोकरीच्या शोधात बाहेर पडत असतात. परंतु त्यांच्यासाठी फक्त १५ ते २० लाख नोकऱ्यांचीच निर्मिती होत असते. नोटबंदीनंतर जानेवारी २०१७ ते एप्रिल २०१७ या काळात १५ लाख कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. हे कामगार अति लघु उद्योग,लघु आणि मध्यम उद्योगांमधले होते. या वास्तवाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून ‘आम्ही बेरोजगारी हटवली’ असे छातीठोकपणे सांगत मुख्यमंत्र्यांकडून आपलेच घोडे पुढे दामटविण्याचा प्रयत्न वारंवार होताना दिसतो.

आजचा तरुण हुशार आहे, कोण खरं बोलतो आणि कोण थापा मारतो, हे त्यांना बरोबर कळतं. म्हणूनच देशाचे आधारस्तंभ असलेल्या युवावर्गाची मुख्यमंत्र्यांकडून नोकऱ्यांसंदर्भातली होणारी थट्टा थांबवावी, असे तरुणाईचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.