Talegaon : कंपनीत पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने तिघांची पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नफा मिळवून देण्याचा बहाण्याने तिघांना कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. तिघांनी पैसे गुंतवल्यानंतर ठराविक कालावधीनंतर त्यांना कंपनीतून मिळणार नफा दिला नाही. तसेच त्यांनी गुंतवलेली रक्कमही दिली नाही. याबाबत पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2013 ते 9 मार्च 2019 या कालावधीत मावळ तालुक्यातील धामणे येथे घडली.

भरत दत्तात्रय आढाव (वय 45, रा. धामणे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चंद्रकांत महादेव मोरे (वय 53), निर्मला महादेव मोरे (वय 48), प्रतीक महादेव मोरे (वय 25, तिघे रा. पाटील नगर, चिखली), रामचंद्र मनी गट्टा (वय 49, रा. बोरडेवाडी, मोशी) यांच्या विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग व्हिजन या कंपनीचे मालक चंद्रकांत मोरे आणि अन्य सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचे मित्र युवराज सोरटे, दत्तात्रय जांभूळकर यांना त्यांच्या कंपनीत आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांनी कंपनीची बनावट कागदपत्रे बनवली. त्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे फिर्यादी व त्यांच्या मित्रांना नफा तसेच गुंतवलेली रक्कम न देता त्यांची पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.