Talegaon : मोठी बातमी ! जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर गोळीबार आणि वार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 12) दुपारी घडली. (Talegaon) त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. किशोर आवारे यांना मानणारा तळेगावात मोठा वर्ग होता. आपल्या सहकाऱ्यांसमवेत समाजकार्यात त्यांनी वाहून घेतलं होतं. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

किशोर आवारे हे शुक्रवारी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी गेले होते. मुख्याधिकाऱ्यांना भेटून ते इमारतीच्या खाली आले. नगरपरिषदेच्या समोर येताच चार जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आवारे यांच्यावर गोळीबार तसेच कोयत्याने वार करण्यात आले. नगरपरिषद कार्यालयासमोर गोळीबार झाल्यानंतर जखमी अवस्थेत किशोर आवरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला शिवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Kishore Aware : जनतेचे रक्षण करण्याचे बंधन जोपासणारा नेता म्हणजेच किशोर आवारे

 

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून आवारे यांनी तळेगावात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी दांडगा जनसंपर्क बनवला होता. सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून किशोर आवारे यांनी राजकारणात आपले स्थान बळकट केले होते.

आवारे यांच्यावर सायंकाळी 8 वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तत्पूर्वी सायंकाळी 6 वाजता तळेगाव स्टेशन येथील स्वप्ननगरीतील त्यांचे निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ह्या घटनेने तळेगाव दाभाडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.