Talegaon Dabhade : केवळ खबरदारी म्हणून एनडीआरएफचे ‘ते’ जवान विलगीकरणात – सीओ दीपक झिंजाड

एमपीसी न्यूज – दिल्ली मधील निजामुद्दीन येथे विविध कारणांनी संपर्क आलेल्या सर्व नागरिकांना विलगिकरण कक्षात ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. तळेगाव येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) चार जवानांना खबरदारी म्हणून विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

तळेगाव येथील एनडीआरएफचे चार जवान दिल्ली मधील निजामुद्दीन परिसरात गेले होते. तिथे त्यांचा निजामुद्दीन परिसरातील नागरिकांशी कोणत्या ना कोणत्या कारणाने संपर्क आला आहे. तिथून हे जवान 18 मार्च रोजी पुण्यात दाखल झाले होते. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आलेली नाहीत. तरीही खबरदारी म्हणून त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी देखील केली आहे. त्या तपासणीमध्ये चारही जवान फिट असल्याचे सांगण्यात आले आहे.

निजामुद्दीन येथे झालेल्या एका समाजाच्या कार्यक्रमात अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर केंद्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. देशभरातील सर्व राज्यातील प्रशासनाला केंद्राने काटेकोर सूचना दिल्या. त्यामध्ये दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरातून येणाऱ्या प्रत्येकाला विलगिकरण कक्षात ठेवण्याबाबत सांगण्यात आले. त्यावर सर्व पातळ्यांवर कार्यवाही केली जात आहे.

दरम्यान, तळेगाव दाभाडे आणि परिसरात निजामुद्दीन येथून आलेल्या एका ठराविक समाजाच्या लोकांना विलगिकरण कक्षात ठेवण्याची अफवा पसरविण्यात आली होती. यातून सामाजिक द्वेष पसरण्याची भीती आहे. त्यामुळे तसा प्रकार नसून विलगिकरण कक्षात ठेवलेले जवान असून त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तळेगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक झिंजाड म्हणाले, “चार जवानांना केवळ खबरदारी म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हे जवान 18 मार्च रोजी दिल्लीतून पुण्यात आले आहेत. याबाबत प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”

तहसीलदार मधुसूदन बर्गे म्हणाले, “केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार निजामुद्दीन येथून परतणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विलगिकरण कक्षात ठेवली जात आहे. सध्या विलगिकरण कक्षात ठेवलेल्या एनडीआरएफ च्या चारही जवानांना कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र केवळ खबरदारी म्हणून त्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.