Talegaon : लॉकडाउनमुळे तळेगाव एसटी आगाराचे सव्वा दोन कोटींचे नुकसान

एमपीसीन्यूज : कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने २२ मार्चपासून जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे तळेगाव आगारातील लालपरी (एस टी बस) बंद असल्याने रोज मिळणा-या उत्पन्नाला कात्री लागली आहे. त्यामुळे आजपर्यंत सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ तळेगाव दाभाडे आगाराचे प्रमुख तुषार माने यांनी दिली.

तळेगाव दाभाडे एसटी डेपोमधून तालुका पातळीवर तसेच लांब पल्याच्या एसटी बस रोज धावत असतात. यामध्ये या आगारातून रोज तुळजापूर, पंढरपूर, बीड, नाशिक, कोल्हापूर, भगवानगड, अक्कलकोट आदि भागांत गाड्या सोडल्या जातात.

तसेच स्थानिक पातळीवर मावळ व मुळशी तालुक्यात मुक्कामी तसेच परतीच्या अनेक फे-या तळेगाव दाभाडे एसटी डेपो मधून केल्या जातात.

यामधून तळेगाव आगारास रोज सुमारे ४ लाख ५० हजार रुपयाचे उत्पन्न मिळते. दि २२ मार्च पासून हा लालपरीचा प्रवास थांबलेला आहे.त्यामुळे आजपर्यंत तळेगाव आगाराला प्रवाशी भाड्यापासून मिळणारे सुमारे २ कोटी २५ लाख रुपयाचे नुकसान सोसावे लागले आहे.

या आगरामधून रोज मावळ तालुक्याच्या अत्यंत दुर्गम भागातून लालपरीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होत असते. यामध्ये शालेय विद्यार्थी, दुधवाले, कामगार, भाजीपाला विक्रेते, शेतकरी आदीचा सहभाग असतो.

गेली ५४ दिवस हा प्रवास थांबल्याने प्रवाशी लालपरी कधी सुरु होते याची वाट पाहत आहे. तर या आगारातून शासनाच्या आदेशान्वये परराज्यातील नागरिकांना सोडण्याचे काम सध्या चालू आहे, असे आगार प्रमुख तुषार माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.