Talegaon : तळेगावातील पुरुष आणि उर्सेतील महिलेचा  रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; तालुक्यात एकूण 65 रुग्ण

Men from Talegaon and women from Ursa reported corona positive; A total of 65 patients in the taluka

एमपीसीन्यूज : तळेगाव स्टेशन परिसरातील रहिवाशी चिंचवड येथे कामाला असणाऱ्या एका इसमाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. प्रवीण कानडे व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली. तर उर्से ( ता. मावळ) येथील 26 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल आज, मंगळवारी पाॅझिटिव्ह आल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.

त्यामुळे मावळातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 65 झाली असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील 30 कोरोना सक्रिय रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उर्से येथील 26 वर्षीय महिलेला बरे वाटत नसल्याने आढले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. या महिलेला कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी औंध येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

त्यांचा स्वॅब अहवाल आज, मंगळवारी पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे या महिलेच्या संपर्कातील तिच्या पतीचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

तळेगाव स्टेशन येथील 50 वर्षीय पुरुष आणि त्यांचा 21 वर्षीय मुलगा चिंचवड येथील एका गॅस एजन्सीमध्ये नोकरीला आहे. या दोघांचे स्वॅब नमुने दि. 20 जून रोजी घेण्यात आले होते. दि. २२ जूनला त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये वडिलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला.

या व्यक्तीला ताथवडे येथील बालाजी कॉलेज केव्हीड १९ कक्षात उपचारासाठी ठेवले आहे. तर मुलाला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील त्याची पत्नी व दुसरा मुलगा यांना येथील सुगी पश्चात प्रशिक्षण केंद्रात संस्थात्मक विलगीकरण कक्ष ( केव्हीड १९ विभागामध्ये) उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.

तसेच संक्रमित रुग्ण तळेगाव स्टेशन हद्दीत ज्या ठिकाणी राहत आहे. त्या ठिकाणी सूक्ष्म कंटेनमेंट झोन तर त्या परिसराचा इतर भाग बफर्स झोन म्हणून मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी जाहीर केला आहे.

मावळ तालुक्यात आजपर्यंत शहरी भागात 22 व ग्रामीण भागात 43 असे एकूण 65 कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. त्यापैकी 33 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. दोन जणांचा मृत्यू झाला तर सक्रिय रूग्णांची संख्या 30 आहेत.

मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कोवीड समर्पित रुग्णालयात उपचारा दरम्यान देहू येथील 75 वर्षीय कोवीड रुग्णाचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृतदेहावर तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत गॅस दाहीनीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.