Talegaon MIDC Crime News : पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. अटक केलेल्या तरुणाकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

शेखर रमेश काकरे (वय 29, रा. ओटास्किम, निगडी. मूळ रा. जांभुळगाव, मारुती मंदिराच्या मागे, ता. मावळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे व श्यामसुंदर गुट्टे यांना माहिती मिळाली की, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वराळे फाटा चौकात एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी वराळे फाटा चौकात सापळा लावून वराळे गावात जाणा-या रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या शेखर याला ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच शेखर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

_MPC_DIR_MPU_II

त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले एक देशी बनावटीच्या पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी हा 53 हजारांचा ऐवज जप्त केला. पिस्टल वापरण्याच्या परवान्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयातून आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडे पिस्टल वापरण्याचा परवाना नसल्याचे तसेच तो पिस्टल विक्रीसाठी आला असल्याचे पोलिसांना सांगितले.

याबाबत शेखर याच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, युनिट पाचचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, श्यामसुंदर गुट्टे, मयुर वाडकर, धनराज किरनाळे, संदिप ठाकरे, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, भरत माने, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1