Talegaon MIDC : धोकादायकरित्या पार्क केलेल्या डंपरला धडकून दुचीकीस्वाराचा मृत्यू

कातवी हद्दीत तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर धोकादायकपणे उभ्या असलेल्या एमएच 14 / जीयु 7066 क्रमांकाच्या डंपरला पाठीमागून दुचाकीस्वाराची जोरात धडक बसली.

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर धोकादायकरित्या उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीस्वाराची पाठीमागून जोरात धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.  सोमवारी (दि. 7) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कातवी जवळ हा अपघात घडला.

मित्रजित राम सावंत (वय 24, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ ), असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

महादेव बाबुराव म्हस्के (रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी डंपर चालक गणेश राजू शेळके (रा. आंबी, ता. मावळ, मूळ रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मित्रजित सावंत सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच 14 / एचआर 1463) नवलाख उंब्रे येथून वराळे येथे घरी जात होता.

कातवी हद्दीत तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर धोकादायकपणे उभ्या असलेल्या एमएच 14 / जीयु 7066 क्रमांकाच्या डंपरला पाठीमागून दुचाकीस्वाराची जोरात धडक बसली.

त्यात डोक्याला पायाला गंभीर जखम झाल्याने मित्रजित सावंत याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड तपास करीत आहेत.

एमआयडीसी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धोकादायक अवजड वाहने उभी केली जात आहेत. ही वाहने आणखी किती नागरिकांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.