Talegaon Dabhade: …म्हणून मावळवासीयांनी घराबाहेर पडू नये – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – परदेशात जाऊन आल्याने क्वारंटाईनमध्ये राहायला सांगितलेले मुंबईतील अनेकजण मावळात येऊन विविध ठिकाणी थांबले आहेत. त्यांच्याकडून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मावळवासीयांनी आपापल्या घरात थांबावे, असे आवाहन आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी केले आहे. 

कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला असून भारतात विशेषतः मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत 50 पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यास काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे परदेशातून आलेल्या सर्वांनाच 14 दिवस आपापल्या घरामध्येच क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील अनेकांचे मावळात फार्म हाऊस, बंगले आहेत. क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश असलेले मुंबईकर मुंबईत त्यांच्या घरी राहण्याऐवजी मोठ्या संख्येने मावळात येऊन राहिले आहेत, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.

मावळात येऊन ही मंडळी बंगल्यात अथवा त्यांच्या खोलीत थांबणे अपेक्षित असताना काहीजण मात्र पर्यटनाला आल्याप्रमाणे परिसरात फिरताना दिसत आहेत. या व्यक्ती कोरोना संशयित आहेत. त्यांच्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर मावळवासीयांनी स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन बाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही आमदार शेळके यांनी केले आहे.

लोणावळ्यातही होणार वॉर्डनिहाय भाजी विक्रीची व्यवस्था

तळेगाव दाभाडे प्रमाणे गर्दी टाळण्यासाठी  लोणावळ्यातही वॉर्डनिहाय भाजी विक्रीची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती शेळके यांनी दिली. प्रत्येक वॉर्डमध्ये भाजी व फळविक्रीचे स्टॉल लावून लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून घराजवळ भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्याच्या पॅटर्नचे राज्यभर कौतुक झाले. अनेक ठिकाणी तळेगाव पॅटर्न राबविला जात आहे.

लोणावळ्यातही तो पॅटर्न चालू करण्याबाबत नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी तसेच भाजी व फळ विक्रेत्यांशी चर्चा झाली. त्यात सर्व नियोजन करण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.