Talegaon : नवीन आगी बंब कार्यरत होण्यासाठी आणखी 3 ते 4 महिन्यांची प्रतीक्षा

आपत्कालीन परिस्थितीत अन्य ठिकाणच्या बंबाचा आधार घ्यावा लागणार

एमपीसी न्यूज – तळेगाव नगरपरिषदेला नवीन आगी बंब मिळण्यासाठी आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अग्निशमन पर्यवेक्षक पदमनाभ कुल्लरवार यांनी दिली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तळेगाव एमआयडीसी आणि अन्य ठिकाणच्या बंबाचा आधार घ्यावा लागणार आहे. 

चाकणमध्ये 30 जुलैला झालेल्या जाळपोळीत समाजकंटकांनी आणि क्रोधीत जमावाने तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा अग्नीशमन बंब जाळण्यात आला. त्यामुळे येथील अग्निशमन दलास बंबाअभावी अडचण भासत आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा संपल्यानंतर, समाजकंटकांनी केलेल्या जाळपोळीची आग विझविण्यासाठी बोलविण्यात आलेला तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा 30 लाख रुपये किंमतीचा अग्निशमन बंब देखील लक्ष्य करुन जाळण्यात आला. सुदैवाने अग्निशमन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पळ काढल्याने ते बालंबाल बचावले. मात्र, तळेगाव नगरपालिकेकडे असलेला एकमेव बंब जाळून खाक झाला.

दरम्यान, पंचनामा करुन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. तसेच पालिका प्रशासनाने विम्याच्या भरपाईसाठीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. नवीन बंबासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रक्रिया आणि बंब कार्यान्वित होण्यासाठीचा कालावधीपाहता आणखी किमान तीन-चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. साधारणतः जानेवारी 2019 मध्ये नवीन बंब उपलब्ध होईल, असे कुल्लरवार यांनी सांगितले.

त्यामुळे दुर्दैवाने काही आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास तळेगाव एमआयडीसी अथवा अन्य ठिकाणच्या बंबांचा आधार घेण्याशिवाय नगर परिषदेला पर्याय नाही. लवकरात लवकर नवीन बंब उपलब्ध होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी याकामी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची गरज सजग नागरिक आणि व्यवसायिकांमधून व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.