Talegaon : आनंदाच्या वाटा शोधता यायला हव्यात- डॉ. संजय कळमकर

एमपीसी न्यूज – आकाशातील ढगांकडे पाहिले असता आपल्याला नानाविध आकार दिसतात, तसेच आनंदाच्या वाटा अनेक आहेत, फक्त त्या वाटा शोधणारी सकारात्मक दृष्टी आपल्याकडे हवी, असे प्रतिपादन संजय कळमकर यांनी केले.

श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत रविवारी (दि.15) प्रथम पुष्प गुंफताना ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर डॉ. कळमकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेचे माजी सभापती अशोक काळोखे होते. नगरसेविका संगीता शेळके, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, उमाकांत कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे अध्यक्ष विठ्ठल कांबळे, विलास कुलकर्णी, श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, सचिव दिलीप राजगुरव आदी उपस्थित होते.

डॉ. कळमकर पुढे म्हणाले, दुसऱ्याच्या दु:खात आनंद मानणारी माणसे विक्षिप्त असतात. आता तर सगळेच अस्वस्थपणे जगताना दिसतात. कारण जे वास्तव आहे ते स्वीकारण्यापेक्षा आपण अनेक अवास्तव अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षाभंगाचे दु:ख भोगतो. अन्न, वस्त्र, निवारा यांच्या इतकीच किंवा त्यापेक्षाही मोबाईल ही आपली अत्यावश्यक गरज बनली आहे. टीव्ही मालिकांच्या आभासी दुनियेत आम्ही इतके रंगून गेलो आहोत की भोवतालच्या वास्तवाचे आम्हाला भान राहिलेले नाही. आपल्या घरातील व्यक्तींशी संवाद साधण्यापेक्षा टीव्ही मालिकांतील पात्रे आम्हाला जवळची वाटू लागली आहेत. फेसबुकवर आम्हाला जागतिक दु:खाची काळजी वाटते, परंतु घरातील आई वडील, पत्नी किंवा मुले यांच्या सुख-दु:खाविषयी आमच्या संवेदना बोथट होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाचा अतिरेक झाल्यामुळे जगण्यातील गंमत कमी झाली आहे. प्रत्येक जुनी पिढी नव्या पिढीचे वर्णन ‘बिघडलेली पिढी’ असे करते, परंतु, ज्येष्ठांनी आपली मानसिकता बदलायला हवी. त्यामुळे त्यांना घरात एकाकीपणा वाटणार नाही. आता नातेसंबंधसुद्धा ‘ऑनलाईन’ झाले आहेत, पण ते हळूहळू स्वीकारायला हवे. खरं म्हणजे आनंद सर्वत्र आहे पण तो शोधता यायला हवा, असा सल्ला कळमकर यांनी दिला.

राजेश सूर्यवंशी, बच्चू तांबोळी, प्राचार्य जीवन पाटील, वसंत वर्तक, वैभव देशमुख, मंगेश राजहंस, मयूर राजगुरव, उमाकांत महाजन यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन, तर दिलीप राजगुरव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.