Talegaon News : अवघ्या 4 तासांत 177 रक्तदात्यांनी बजावले कर्तव्य

एमपीसी न्यूज – मावळातील विविध संस्थांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे येथील सुशिला मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर राबविले गेले.

सध्या व्हॉस्पिटलमध्ये भासत असलेला रक्ताचा तुटवडा जाणून घेऊन तसेच 1 मे नंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्यानंतर किमान एक ते दीड महिना रक्तदान करता येणार नाही परिणामी या काळात हाॅस्पीटल मध्ये रक्ताची कमतरता भासु नये म्हणून मावळातील विविध संस्था रक्तदानासाठी पुढे सरसावल्या आहेत.

1 मे कामगार दिनाचे व संभाजी महाराज जयंतीनिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग, जायंटस ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे आणि वारकरी सेवा फाउंडेशन तसेच वन्यजीव रक्षक मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबीरात 177 रक्तदात्यांनी रक्तदान करून बजावले कर्तव्य.

दीपप्रज्वलन करून वारकरी सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप पांडूरंग महाराज शितोळे, सरसेनापती दाभाडे घरण्याचे वंशज सत्येंद्रराजे दाभाडे सरकार व याज्ञीसेनीराजे दाभाडे सरकार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली, तसेच वारकरी सेवा फाउंडेशनचे हभप संजय हिवराळे महाराज आणि उद्योजक संतोष परदेशी तसेच फाॅरेस्ट अधिकारी वाघमारे मॅडम, पोलिस अधिकारी वाबळे साहेब, बाबाराजे मुंडे यांनी देखील उपस्थिती लावली.

मावळ तालुक्यातील कानाकोपऱ्यातून तरुणांनी तसेच महिलांनी अधिक संख्येने येऊन उस्फुर्त आणि स्वंयमस्फुर्तीने कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता कर्तव्य बजावले.

प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायझर व N 95 मास्क भेट देण्यात आले. आज झालेल्या रक्तदान शिबिरास मावळवासीयांनी भरघोस प्रतिसाद दिला, कोरोनाचे नियम पाळून सुसज्ज अश्या सुशिला मंगल गार्डनमध्ये हा उपक्रम सकाळी 10 ते 3 या कालावधी मध्ये झाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील राष्ट्रसेवेसाठी आपले रक्त कोणाचाही जीव वाचवण्याच्या कामी यावे या एका हेतूने सर्व जण उपस्थित होते त्यांचे संस्थेच्या वतीने दत्तामामा कुंजीर यांनी आभार मानले. तसेच सहयाद्री प्रतिष्ठान मार्फत कोरोना कालावधीमध्ये सर्वांच्या सोयी साठी एक HELPLINE सुरू करण्यात येणार आहे. प्लाझ्मा, ब्लड, आणि बेड उपलब्ध करून देण्यासाठी एक नियोजन समिती बनवून ती 2 दिवसात कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.