Talegaon News: वर्षाविहारासाठी आलेला पिंपरीतील तरुण कुंडमळा धबधब्यात बुडाला

Talegaon News: A young from Pimpri drowned in a Kundmala waterfall चप्पल धुण्यासाठी तो पाण्यात गेला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला काठावर येता आले नाही.

एमपीसी न्यूज – वर्षाविहारासाठी तळेगाव जवळील कुंडमळा धबधब्यात आलेला पिंपरीतील तरुण बुडाला. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून एनडीआरएफचे पथक त्याचा शोध घेत आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) दुपारी घडली. तरबेज शाहजान पटेल (वय 30, रा. खराळवाडी, पिंपरी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरबेज आपल्या तीन मित्रांसोबत तळेगाव जवळ इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळ्यात वर्षाविहारासाठी आला होता.

दुपारी चप्पल धुण्यासाठी तो पाण्यात गेला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला काठावर येता आले नाही. त्यामुळे तो वाहून गेला.

आपल्या डोळ्यादेखत आपला मित्र वाहून गेल्याने घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरुवातीला नदीपात्राच्या परिसरात शोध घेतला. मात्र, तरबेजचा पत्ता लागला नाही.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एनडीआरएफच्या पथकाला याबाबत माहिती दिली आहे. मात्र रात्र झाली असल्याने तसेच पाण्याचा प्रवाह धोकादायक असल्याने एनडीआरएफच्या जवानांनी पाण्यात उतरण्यास नकार दिला. बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून एनडीआरएफचे पथक तरबेजचा शोध घेत आहेत.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने ही बंदी घातली आहे. मात्र, अनेकजण प्रशासनाच्या आदेशाला झुगारून वर्षाविहारासाठी घराबाहेर पडत आहेत.

तळेगाव शहराच्या जवळ असलेल्या कुंडमळा धबधब्यावर देखील दरवर्षी पर्यटक गर्दी करतात. यावर्षी बंदी असल्याने काहीजण नजर चुकवून इथे येऊन पाण्याचा आनंद घेतात. असाच आनंद घेण्यासाठी तरबेज आणि त्याचे तीन मित्र आले होते. मात्र, हलगर्जीपणा जीवावर बेतला आहे.

याबाबत अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. तरबेजचा शोध लागल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.