Talegaon News: आमदार शेळके यांच्या मध्यस्थीने टळली शिक्षकांवरील कारवाई

एमपीसी न्यूज – ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आरोग्य मोहिमेत सहभागी न झालेल्या खासगी शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांवर मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मध्यस्थी करून या मुख्याध्यापक व शिक्षकांची बाजू प्रभावीपणे मांडली आणि त्यामुळे त्यांच्यावर होणारी संभाव्य कारवाई अखेर टळली आहे.

अनेक खाजगी शैक्षणिक संस्थाचे शिक्षक व मुख्याध्यापक या आरोग्य मोहिमेत सहभागी होत नसल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे या मोहिमेत सहभाग होत नसलेल्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिले होते.

या पार्श्वभूमीवर खाजगी शैक्षणिक संस्थाचे संस्थाचालक आम्हाला या मोहिमेत काम करू देत नाहीत. आमच्यावर त्यांचा दबाव येत असल्याने आम्ही या आरोग्य मोहिमेत काम करू शकत नाही, अशी वस्तुस्थिती या शिक्षकांनी आमदार शेळके यांच्यापुढे मांडली. आमची या मोहिमेत काम करण्याची इच्छा असूनही आम्हाला काम करण्यास मज्जाव केला जात आहे. त्यामुळे आमच्यावर कारवाई करू नये, अशी विनंती शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आमदार शेळके यांच्याकडे केली होती.

आमदार शेळके म्हणाले, “शिक्षक वर्ग सध्या द्विधा मनःस्थितीत असून त्यांनी आजपर्यंत कोरोना संकटकाळातही आपले कर्तव्य बजावले आहे. परंतु संस्थाचालकांच्या दबावामुळे खाजगी शैक्षणिक संस्थांचे शिक्षक व मुख्याध्यापक जे या मोहिमेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नयेत, अशी विनंती प्रांताधिकारी यांना केली.

मुख्याध्यापक व शिक्षकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी शिर्के यांची भेट घेऊन, यांच्यापुढेही वस्तुस्थिती कथन केली. संस्थाचालकांनी परवानगी दिली नाही तरी यापुढे शासनाच्या प्रत्येक मोहिमेत सहभागी होण्याची ग्वाही त्यांनी दिली. पुढील मोहिमेत सहभागी झालो नाही तर आवश्य कारवाई करावी, अशी विनंती शिक्षकांनी केली.

आमदार शेळके व शिक्षकांच्या विनंतीनंतर प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांविषयी सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोनातून सौम्य भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांनी आमदार शेळके व प्रांताधिकारी संदेश शिर्के यांचे विशेष आभार मानले आहेत.

शासनाच्या वतीने मावळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस पाटील, नगरपरिषद कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक व सामाजिक स्वयंसेवी संस्था यांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले होते.

तळेगाव दाभाडे शहरात काल (गुरुवारी) ही आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. शहरातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी या मोहिमेत शासकीय यंत्रणेसोबत सर्व क्षेत्रातील स्वयंसेवकांचा सहभाग गरजेचा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.