Talegaon News : कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार- अनिल भांगरे

एमपीसी न्यूज – कथित प्रकरणी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची आपली तयारी असून त्याबाबत सखोल चौकशी करावी, चौकशीसाठी पोलिसांना लागणारे यथायोग्य सहकार्य करू, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांना दिले आहे.

पिस्तुलाचा धाक दाखवून अशिक्षित महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शालन शिंदे यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गंभीर आरोप केले होते.

या सर्व आरोपाचे अनिल भांगरे यांनी खंडण केले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या व्यवसायाच्या अनुषंगाने बरेचसे लोक कामानिमित्त माझ्याकडे येत असतात आणि त्यांची कामेही करत असतो. सदर निवेदनकर्ती त्यांच्या मिळकतीच्या महसूल अभिलेख सदरी नावे लागावी म्हणून सलीम काझी यांच्यामार्फत आपल्याकडे आल्या होत्या. त्यांनी सोपविलेले काम 4 ते 5 महिन्यात मदत करून देऊन त्यांची नावे महसूल अभिलेख सदरी लागलेली असून त्यांच्या मिळकतीबाबत येथून पुढे कोणतेही व्यवहार करू नका असे निवेदनकर्ती यांनी सांगितले होते.

तेव्हापासून आजतागायत अर्थात चार ते साडेचार वर्षात भेटगाठ नाही, फोनही नाही, त्यांना पाहिले नसल्याचे व काडीमात्र संबंध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनकर्ती यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे आपले समाजातील स्थान, मान, प्रतिष्ठा यांना धक्का लागलेला असून आपली मानहानी झालेली आहे. आपल्या विनाकारणास्तव मानहानीस सर्वस्वी निवेदनकर्ती पूर्णपणे जबाबदार असल्याचे भांगरे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. तसेच निवेदनकर्ती यांनी आरोपात म्हटल्याप्रमाणे त्यांची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आपल्याकडे नाहीत, असेही भांगरे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.