Talegaon News : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोफत एसटी पास देण्याची घोषणा मुलींच्या शिक्षणाला चालना देणारी – नगरसेविका वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोफत एसटी पास मिळण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना जाहीर केली. ही योजना ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देणारी असल्याचे मत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका व पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस वैशाली दाभाडे यांनी व्यक्त केले. तसेच या योजनेचे स्वागतही केले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागातून शाळेसाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत एसटी प्रवासाची घोषणा केली आहे. ही घोषणा ग्रामीण भागाकरिता अत्यंत मोलाची आहे.

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला या घोषणेमुळे चालना मिळणार असून, शिक्षणातील मुलींची गळती कमी होईल. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण केवळ आर्थिक परिस्थितीमुळे थांबत होते ते आता थांबणार नाही. त्यांना चांगली संधी मिळेल. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांनी केलेल्या या घोषणेचे स्वागत आहे. कल्याणकारी काम या सरकारकडून होत आहे. या निर्णयामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घराघरात स्त्री शिक्षणाच्या रूपाने जी ज्योत लावलेली आहे ती अजून प्रज्वलित होईल.

राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्या लोक कल्याणकारी घोषणेचे जनता मनापासून स्वागत करेल तसेच या योजनेचा विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतील, असा विश्वास देखील नगरसेविका दाभाडे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.