Talegaon News :  विकासकामांतर्गत केलेले डांबरीकरण दोन दिवस पडलेल्या पावसामुळे गायब; अनेक ठिकाणी चिखल 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील विकासकामांतर्गत भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील अनेक भागात रस्ते डागडुजी करून डांबरीकरण करण्यात आले; मात्र हे डांबरीकरण दोन दिवस पडलेल्या पावसामुळे गायब झाले आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी चिखल झाला असून नागरिकांना ये-जा करणे अडचणीचे झाले आहे.

शहरात काही दिवसापूर्वी भुयारी गटारसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सद्या झालेल्या पावसामुळे केलेले डांबरीकरण गायब झाले आहे. त्या ठिकाणी चिखल, पाणी व रस्त्यामध्ये खड्डे याला तोंड देऊन नागरिकांना चालणे वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. भुयारी गटारचे खड्डे बुजवण्यासाठी केलेले डांबरीकरण उत्तम दर्जाचे का केले नाही. या कामावर प्रशासनाने लक्ष का दिले नाही असा सवाल नागरिक करत आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये भुयारी गटार योजनेच्या कामाला अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे काही ठिकाणी खोदकाम करून त्यावर डांबरीकरण देखील केले आहे. काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या पावसात काही ठिकाणी डांबरीकरण गायब झाले आहे. गेली दोन महिने कोरोना संक्रमण व त्यामुळे शासनाने पुकारलेले लाॅकडाऊन यामुळे व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडले आहे. शासनाने सध्या लाॅकडाऊनच्या वेळेत शिथिलता दिली आहे. परंतु बाजार पेठेत भुयारी गटाराचे काम चालू असल्याने रस्त्याच्या मधोमध खोदकाम झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी दुकानात येणे आवघड झाले आहे.

नगरसेवकांनी गावठाण भागामध्ये पावसाळ्यापूर्वी गटरचे काम करावे. ते पावसाळ्यामध्ये करू नये. असे प्रशासनाला सुचवलं होतं. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत पावसाळ्यात काम सुरु केले आहे. त्यामुळे त्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून या खड्ड्यांमुळे वाहतुकीला तसेच चालताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.