Talegaon News : शिक्षण संस्थेची निवडणूक असल्याने खोटे आरोप करून बदनामीचा प्रयत्न – प्रा. बाळसराफ

एमपीसी न्यूज – मावळ शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक मंगळवारी (दि. 10) रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कुटील कारस्थान केले जात असल्याचा प्रत्यारोप संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. दत्तात्रय बाळसराफ यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अभय देवकर यांनी प्रा. बाळसराफ यांना मावळ शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालक मंडळावरून काढून टाकण्याची मागणी केली होती. याबाबत बाळसराफ यांनी ‘एमपीसी न्यूज’कडे लेखी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रा. बाळसराफ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्याविरुद्ध केवळ आकस, द्वेष, मत्सर या भावनेने संपूर्णपणे खोटे व असत्य आरोप करून बदनामी केली जात आहे. याचा मी निषेध करतो. माझ्याविरुद्ध कोणत्याही पोलीस ठाण्यात विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचा एकही गुन्हा नोंदवलेला नाही. मला ‘हनीट्रॅप’मध्ये कूटनीतीने अडकवून बदनामी करणाऱ्या विरुद्ध मी स्वतः तळेगाव पोलीस ठाण्यात रीतसर लेखी तक्रार करून त्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल केलेला आहे.

या प्रकरणामध्ये मी फिर्यादी असून केवळ कायद्याचे अज्ञान व गैरसमज पसरवून मी आरोपी असल्याचे म्हटले आहे. माझ्यावर होणारे आरोप पूर्णपणे खोटे असून समाजातील प्रतिमा डागाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रा. बाळसराफ यांनी पुढे म्हटले आहे की, मावळ शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक मंगळवार (दि. 10) रोजी होणार आहे. सन 1991 मध्ये या संस्थेची स्थापना करून संस्थेचे विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात माझा सिंहाचा वाटा आहे. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या विधायक सूचनेनुसार मावळचे आमदार सुनील शेळके यांना संस्थेचे अध्यक्ष म्हणून एक मताने निवडून देण्याचे सर्वांनी मान्य केले आहे. संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांबाबत संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी निर्णय होणार आहे.

या पार्श्वभूमीवर माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कुटील कारस्थान केले जात आहे. याबाबत आपण लवकरच फौजदारी आणि दिवाणी दावे दाखल करणार आहे. तथाकथित सामाजिक कार्यकर्ता अभय देवकर यांचा बोलवता धनी कोण आहे, याबाबत माहिती मिळण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज दाखल करणार आहे. या प्रकरणात अब्रूनुकसान भरपाईचा दावाही दाखल करणार असल्याचे प्रा बाळसराफ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.