Talegaon News : नगरपरिषद प्रशासनासमोर मालमत्ता करवसुलीचे मोठे आव्हान

एमपीसी न्यूज – कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मालमत्ता कराची 25 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी असून आगामी तीन महिन्यात ती वसूल करणे हे नगरपरिषद प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. तळेगावातील 35 हजार मालमत्ता धारकांकडून सुमारे 25 कोटी 71 लाख रुपयांची वसुली करावयाची आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वसुली यंत्रणा पूर्णपणे थंडावली होती. तर मालमत्ता धारकांकडूनही भरणा होत नव्हता. त्यामुळे आत्तापर्यंत 9 महिन्यांच्या कालावधीत 12.9 टक्के वसुली झालेली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट आहे; मात्र कोरोनाचे वातावरण कमी होताच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड आणि करनिरीक्षक विजय शहाणे यांनी वसुली यंत्रणा सक्रिय केलेली आहे.

नगर परिषद हद्दीतील 35 हजार मालमत्ता धारकांकडून 25 कोटी 71 लाख 39 हजार 978 रुपये येणे बाकी आहेत. यासाठी वसुली विभागाकडून सर्व मिळकतधारकांना वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या असून आपला कर भरणा वेळेत करा, अशी विनंती करण्यात आलेली आहे.

1 एप्रिलपासून आतापर्यंत म्हणजेच नऊ महिन्यात तीन कोटी 79 लाख 2 हजार 304 रुपये एकत्रित कर, शिक्षणकर, रोजगार हमीकर, वृक्षकर, अग्निशमन, विशेष स्वच्छता कर उपयोगकर्ता शुल्क आदीपोटी नगर परिषदेकडे जमा झालेले आहेत. तर सर्व विभागातील वसुली अधिकारी वसुली करण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत.

सध्या पाणी पुरवठा विभागाने वसुलीत बाजी मारली असून आतापर्यंत 42 टक्के कर वसूल केलेला आहे. दोन कोटी 86 लाख 35 हजार पाणीपट्टी वसूल करावयाची होती. आतापर्यंत एक कोटी 20 लाख वसूल झालेल्या असल्याचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख स्मिता गाडे यांनी सांगितले. तर येथून पुढे एक कोटी 66 लाख रुपये वसूल करणार आहेत.

मुख्याधिकारी दीपक झिंजाड आणि कर निरीक्षक विजय शहाणे तसेच पाणीपुरवठा विभाग प्रमुख स्मिता गाडे यांनी वसूलीसाठी खास नियोजन केले असून अधिकाधिक वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.