Talegaon News : ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे उर्से टोलनाका येथे चक्काजाम आंदोलन

एमपीसीन्यूज : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या राजकीय आरक्षणासाठी मावळ तालुका भाजपच्या वतीने शनिवारी (दि.26) पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर  उर्से टोलनाका येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळेच हे आरक्षण रद्द झाले असल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून उर्से येथे मावळ तालुका भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी अकरा वाजता उर्से टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. सुमारे 20-25 मिनिटे चाललेल्या आंदोलनात राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. हातात भाजपचे झेंडे घेत घोषणा देत टोल नाका येथे चक्का जाम करत आंदोलन केले.

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन व शिरगाव पोलीस चौकीच्या वतीने आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे काही काळ उर्से टोलनाक्याला छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलनामुळे द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे व कार्यकर्त्यांच्या वतीने मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

दरम्यान, शिरगाव पोलिसांनी 18 आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. यामध्ये माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, बाळासाहेब घोटकुले, रवींद्र विधाटे, किरण राक्षे, सचिन जाधव, संदीप काकडे, रवींद्र माने, शरद साळुंखे, विनायक भेगडे, चित्रा जगनाडे, रजनी ठाकूर आदींसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.